Join us

धारावी बलात्कार प्रकरण; धक्क्याने चौहान बंधूंनी अखेर सोडून दिली मुंबई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 11:52 AM

धारावी बलात्कार प्रकरण; निष्पाप भावंडांची झाली होती सुटका

मनीषा म्हात्रे मुंबई : केवळ नशीब बलवत्तर म्हणून ते अधिकारी पोलीस ठाण्यात आले. त्यांच्या चाणाक्ष नजरेने घडलेले खोटे पकडले गेले आणि दोघा निष्पाप भावंडांची काळ्या कोठडीतून सुटका झाली. मात्र, त्या दोघांनी या घटनेचा असा काही  धसका घेतला की, दोघांनीही मुंबई शहराला कायमचा रामराम केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. धारावी बलात्कार प्रकरणात खोटी फिर्याद देणाऱ्या त्या तरुणीकडेही उलट तपासणी सुरू केली आहे.मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या चौहान बंधूंनी इतरांप्रमाणेच नोकरीच्या शोधात मायानगरी मुंबई गाठली. विलेपार्ले पूर्वेकडील प्रेमनगर झोपडपट्टीतील दहा बाय दहाच्या खोलीत ते राहण्यास होते. यातील अनिल (१९) हा सलूनमध्ये काम करू लागला, तर नीलेश (२० ) हा बिगारी काम करून दोघेही पोटाची खळगी भरून गावाकडील कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. मात्र, आपल्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवले आहे, याची पुसटशीही कल्पना या दोघांना नव्हती.

धारावी बलात्कार प्रकरणात चौहान बंधूंना बेड्या ठोकल्या आणि दोघांनाही प्रचंड मानसिक धक्का बसला. तरुणीने दिलेल्या वर्णनावरून पोलिसांनी दोघांना त्या स्केचमध्ये बसवत तरुणीसमोर उभे केले. तरुणीनेही हेच ते दोघे नराधम असे म्हणताच तपास अधिकाऱ्यांचा या दोघांवरील दबाव वाढला. पोलिसांच्या याच दबावाला बळी पडून न केलेल्या बलात्काराची कबुली त्यांना द्यावी लागली. आपली व्यथा सांगणार तरी कोणाला, या विवंचनेत दोघेही अडकले होते. मात्र, सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे या दोघांसमोर एका देवदूताप्रमाणे आले. नांगरे पाटील यांच्या चाणाक्ष नजरेने या दोन्ही निष्पापांना हेरले आणि दोघांची कोठडीतून सुटका झाली. मात्र, त्या दोघांना बसलेला धक्का एवढा मोठा होता की, त्या दोघांनीही मुंबई सोडून थेट गाव गाठले आहे.

‘लोकमत’च्या प्रतिनिधीने शुक्रवारी, चौहान बंधू राहत असलेल्या प्रेमनगर येथील घरी जाऊन दोघांचाही शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या राहत्या घराच्या ठिकाणी पुनर्विकासामुळे बरीच घरे पाडण्यात आली आहेत.  यामध्ये त्यांचेही घर जमीनदोस्त करण्यात आलेले दिसून आले.  आजूबाजूच्या रहिवाशांकडे चौकशी केली असता ते दोघेही गावी गेल्याचे समजले.  ते दोधेही बंधु आपल्ल्या मुळ गावी गेल्याच्या वृत्ताला एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे.

काय आहे प्रकरण?     धारावी परिसरात राहणाऱ्या १९  वर्षीय तरुणीच्या फिर्यादीनुसार, १२ मे रोजी घरात झोपली असताना, तिचे सासरे दरवाजा न लावता घराबाहेर पडले.     त्यानंतर सायंकाळी साडेचारच्या सुमारास घरात घुसलेल्या चव्हाण बंधूंनी चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला होता.     याच आरोपावरून त्यांच्यावर १६ मे रोजी अटकेची कारवाई करण्यात आली होती.

चौकशीअंती कारवाईखोट्या तक्रारीमागचे नेमके कारण, तसेच चौकशीअंती योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे मध्य प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले.

खोट्या तक्रारीमागचे गूढ कायमपोलिसांनी या प्रकरणात केलेल्या प्राथमिक तपासात उत्तराखंडला पळून जायचे असल्यामुळे तरुणीने खोटी तक्रार दिल्याचे समोर येत आहे. मात्र, यामागचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यानुसार तरुणीकडे उलटतपासणी सुरू करण्यात आली आहे.

टॅग्स :गुन्हेगारीधारावीमुंबई