मुंबई : पालिकेच्या मालकीची सुमारे १४७़७७ हेक्टर जागा धारावी विकास प्रकल्पासाठी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे़ या जागेच्या मोबदल्यात पालिकेला १२२० कोटी रुपये तसेच ११ हजार ७७५ सदनिका मिळणार आहेत. त्याचबरोबर अनेक वर्षांपासून रखडलेला धारावी विकास प्रकल्पही मार्गी लागणार आहे़ याबाबतचा प्रस्ताव सुधार समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आला आहे़झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणामार्फत धारावातील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्यासाठी राज्य सरकारने २००७ मध्ये प्रकल्प जाहीर केला, मात्र अनेक कारणांमुळे हा प्रकल्प गेली आठ वर्षे रखडला होता. काँग्रेस सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्पातील सेक्टर पाचचा विकास म्हाडाच्या माध्यमातून सुरू केला़ यातील काही इमारतींचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे़ मात्र पालिकेच्या मालकीची जागा ६१ टक्के आहे़यावर झोपु प्रकल्प राबविण्याची परवानगी पालिका देणार आहे़ या जागेचा दर प्रति चौ़ मी़ २४ हजार ८०० रुपये आहे़ मात्र विकास प्रकल्पाला जमीन देताना त्या जागेच्या बाजारभावाच्या २५ टक्के रक्कम जमीन मालकाला मिळते़ त्यामुळे पालिकेला या जागेच्या मोबदल्यात १२२० कोटी रुपये मिळणार आहेत. ३० वर्षांच्या भुईभाड्याने ही जमीन दिली जाणार आहे़ (प्रतिनिधी)
पालिकेच्या जागेवर धारावीचा पुनर्विकास
By admin | Published: January 26, 2016 2:16 AM