धारावी पुनर्विकासाचे टेंडर १९ तारखेपर्यंत
By admin | Published: January 9, 2016 04:02 AM2016-01-09T04:02:33+5:302016-01-09T04:02:33+5:30
धारावी पुनर्विकासाचे टेंडर १९ तारखेपर्यंत काढण्यात येईल; तसेच प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त ३0 जानेवारीनंतर जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी शुक्रवारी येथे केली.
मुंबई : धारावी पुनर्विकासाचे टेंडर १९ तारखेपर्यंत काढण्यात येईल; तसेच प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त ३0 जानेवारीनंतर जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी शुक्रवारी येथे केली.
धारावीकरांना ३५0 चौरस फुटांचे घर देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर भाजपाच्या वतीने धारावी पोलीस स्टेशनजवळ जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेत महेता बोलत होते. धारावी पुनर्विकासाचा निर्णय सर्व नेत्यांशी चर्चा करून घेण्यात आला असल्याचे, या वेळी महेता म्हणाले. धारावीचा विकास हाच सरकारचा संकल्प असून, त्यानुसार पुढील तीन वर्षांत पुनर्विकासाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार असून, त्या वेळी शिवसेना कार्याध्यक्षांसह रिपाइं आणि इतर पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रित करण्यात येईल, असेही महेता म्हणाले. या वेळी बोलताना भाजपाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले की, धारावीच्या पुनर्विकासातून प्रत्येक सेक्टरमध्ये प्ले ग्राउंड, कार पार्किंग, मंदिर, चर्च, बालवाडी असे सर्वकाही उपलब्ध होणार आहे. धारावीकरांना ३५0 चौरस फुटांचे घर देण्यात येणार असल्याने येथील घराच्या किमतींमध्ये वाढ होणार आहे. यासाठी दलालही वाढणार आहेत. परंतु त्यांच्यावर विश्वास ठेवून घर विकू नका, असे आवाहन त्यांनी केले.
या वेळी खासदार राहुल शेवाळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. निवडणुकीच्या काळात आम्ही धारावीकरांना ४00 चौरस फुटांचे आश्वासन दिले. पण तेवढे घर देणे शक्य नसल्याने आम्ही ३५0 चौरस फुटांचे घर देत आहोत, असे ते म्हणाले. या वेळी भाजपा नेते अॅल्विन दास यांनी धारावीकरांना ३५0 चौरस फुटांचे घर देण्याचा निर्णय जाहीर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांसह गृहनिर्माण मंत्र्यांचे आभार मानले. या सभेसाठी भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)