धारावी पुनर्विकासाच्या निविदांना मुहूर्त मिळेना
By admin | Published: December 8, 2015 01:07 AM2015-12-08T01:07:57+5:302015-12-08T01:07:57+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला धारावीचा पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी गृहनिर्माण विभागाकडून पुन्हा प्रयत्न सुरू झाले आहेत.
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला धारावीचा पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी गृहनिर्माण विभागाकडून पुन्हा प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र, प्रकल्पाच्या निविदा काढण्यास राज्याच्या मुख्य सचिवांची मंजुरी आवश्यक असून गृहनिर्माण विभागातील अधिकारी त्यांच्या भेटीची प्रतीक्षा करत आहेत. हिवाळी अधिवेशनादरम्यान भेट मिळावी यासाठी अधिकारी प्रयत्न करत असून मुख्य सचिवांनी मंजुरी दिल्यास प्रकल्पाच्या निविदा काढण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
धारावीचा पुनर्विकास करण्यासाठी शासनाने धारावी पुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना केली आहे. त्यानुसार प्राधिकरणाने पुनर्विकासासाठी निविदा मागविल्या होत्या. पण त्या तत्कालीन सरकारने रद्द केल्या. त्यामुळे प्रकल्पाच्या कामाला पुन्हा खीळ बसली होती. अखेर हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्राधिकरणाने निविदा मागविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला गृहनिर्माणमंत्र्यांनीही हिरवा कंदील दर्शविला आहे. परंतु मुख्य सचिवांची मान्यता मिळाल्यानंतर निविदा मागविण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
धारावीचा पुनर्विकास ५ सेक्टरमध्ये करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार सेक्टर ५ चे काम म्हाडाकडे सोपविण्यात आले आहे. म्हाडाने या प्रकल्पाची पथदर्शी इमारत उभारली आहे. परंतु त्यामधील घरे ३00 चौरस फुटांची असल्याने त्याचा ताबा घेण्यावरून कडाडून विरोध होऊ लागला आहे. मुख्य सचिवांकडून निविदा काढण्यास मंजुरी मिळाल्यानंतर या प्रकल्पाचे काम पुन्हा मार्गावर येईल.