Join us

धारावीवासीयांना हवी ७५0 चौ. फुटांची घरे

By admin | Published: January 18, 2016 3:12 AM

धारावी पुनर्विकास प्रकल्पातील सेक्टर-१ मध्ये समाविष्ट असलेल्या माटुंगा लेबर कॅम्पमधील इमारती आणि चाळीतील रहिवाशांना ७५० चौरस फुटांचे घर

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पातील सेक्टर-१ मध्ये समाविष्ट असलेल्या माटुंगा लेबर कॅम्पमधील इमारती आणि चाळीतील रहिवाशांना ७५० चौरस फुटांचे घर मिळालेच पाहिजे, अशी एकमुखी मागणी सेक्टर-१ माटुंगा लेबर कॅम्प रहिवाशी संघाने आयोजित केलेल्या बैठकीत करण्यात आली आहे. त्यानुसार धारावी पुनर्विकास प्राधिकरणाला निवेदन देण्यात आले असून, प्राधिकरणाने रहिवाशांना विश्वासात न घेतल्यास, तीव्र लढा उभारण्याचा निर्णय रहिवाशांनी घेतला आहे.धारावी पुनर्विकास प्रकल्पातील झोपडीधारकांना ३५० चौरस फुटांचे देण्याची घोषणा शासनाने केली आहे. त्यामुळे भाजपा-शिवसेनेने धारावीत जागोजागी फलक लावून निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, धारावी सेक्टर-१ मधील माटुंगा लेबर कॅम्पमधील रहिवाशांनी शासनाच्या या निर्णयाचा तीव्र विरोध दर्शविला आहे. महापालिकेचे भाडेकरू असलेल्या माटुंगा लेबर कॅम्पमधील चाळी आणि इमारतींमधील रहिवाशांनाही ३५0 चौरस फुटांचे घर देण्यात येत असल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे.शासनाच्या या अन्यायकारक निर्णयाचा विरोध करण्यासाठी सेक्टर-१ माटुंगा लेबर कॅम्प रहिवाशी संघाने भीमायन बुद्ध विहार माटुंगा लेबर कॅम्प येथे गुरुवारी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला विभागातील शेकडो रहिवासी उपस्थित होते. त्यांनी शासनाच्या निर्णयाचा निषेध केला.सेक्टर-१ हे १४१.९९ एकरवर वसलेले आहे. यामध्ये शाहू नगर, बालिगा नगर, गीतांजली नगर आणि माटुंगा लेबर कॅम्प या इमारती आणि चाळींचा समावेश आहे. किरकोळ प्रमाणात झोपड्या असताना डीआरपीने सर्वांनाच झोपडीधारक ठरविल्याबद्दल रहिवाशांनी या बैठकीत विरोध दर्शवला. सेक्टर १ मध्ये ११ हजार कुटुंबे राहत आहेत. यात इमारती आणि चाळींचा समावेश मोठ्या प्रमाणात असल्याने शासनाला बिल्डरांकडून हजारो कोटी रुपयांचा प्रीमियम मिळणार आहे.