- तेजस वाघमारे, मुंबईधारावीकरांना ३५0 चौरस फुटांचे घर देण्याचे आणि दोन आठवड्यांत पुनर्विकासाच्या निविदा काढण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. धारावी पुनर्विकासासाठी जागतिक निविदा काढण्यात येणार असल्या तरी बांधकाम क्षेत्रात असलेल्या मंदीचा फटका निविदांना बसण्याची शक्यता धारावी पुनर्विकास प्राधिकरणातील अधिकारी व्यक्त करीत आहेत. तसेच धारावीतील ६0 हजार झोपड्यांची पात्रता निश्चित करण्याचेही मोठे आव्हान डीआरपीपुढे असणार आहे.धारावीच्या पुनर्विकासासाठी सरकारने धारावी पुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना केली आहे. परंतु प्रकल्पाचे गुऱ्हाळ गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाच्या निविदा काढण्याची घोषणा केली असल्याने प्रकल्प मार्गी लागणार आहे. गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी पुनर्विकासाच्या निविदा १९ जानेवारीपर्यंत काढण्याची घोषणा केली आहे. परंतु सध्या मुंबईसह देशभरात बांधकाम क्षेत्रात मंदीचे सावट आहे. मुंबईत तर अनेक विकासकांनी बांधलेली हजारो घरे रिकामी पडून आहेत; तर चीनसह इतर देशांमध्येही बांधकाम क्षेत्रासह आर्थिक मंदीचे सावट आहे.धारावी प्रकल्पासाठी निविदा मागविण्यात आल्यानंतर त्याला जागतिक स्तरावरून आणि देशभरातील मोठ्या कंपन्यांकडून कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता असल्याचे, डीआरडीचे अधिकारी सांगतात; त्याचप्रमाणे देशभरात घरांच्या किमतीही घसरल्या असल्याने विकासकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यामध्येच धारावीसारख्या परिसरात प्रकल्पामध्ये गुंतवणूक करण्यासाठी किती कंपन्या रस दाखविणार हे पाहणेही औत्युक्याचे ठरणार आहे. सेक्टर ५चा पुनर्विकास म्हाडामार्फत करण्यात येत आहे; तर उर्वरित ४ सेक्टरसाठी डीआरपीमार्फत निविदा काढण्यात येणार आहेत. विकासकाला प्रत्येक सेक्टरसाठी एक निविदा भरता येणार असल्याची अट या निविदांमध्ये टाकण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.धारावीतील मोक्याच्या भूखंडांवर डोळाधारावी पुनर्विकासाच्या निविदा प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या विकासकांचा डोळा मोक्याच्या भूखंडांवर असणार आहे. सेक्टर-१ हा सर्व सुखसोयींनी युक्त आहे. यामध्ये चाळी आणि इमारतींचा समावेश असल्याने येथे पुनर्विकासातून मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होणार असून, येथे विकासकाला मोठा आर्थिक फायदा होणार आहे. माहीम, माटुंगा रेल्वे स्थानकाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या या विभागांचा पुनर्विकास करण्याकडे विकासकांचा ओढा राहील; तर धारावीतील पिवळा बंगला येथे मेट्रो-३चे रेल्वे स्थानक होणार आहे. या परिसराचा पुनर्विकास करण्यासाठी विकासकांमध्ये मोठी चुरस रंगणार आहे.
मंदीचा फटका धारावीच्या निविदांना?
By admin | Published: January 10, 2016 1:52 AM