मुंबई : म्हाडामार्फत माहीम रेल्वे स्थानक ते धारावी जंक्शनपर्यंत उभारण्यात येणाऱ्या स्कायवॉकचे काम अंतिम टप्प्यात आले असून, तो मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खुला करण्यात येणार आहे. स्कायवॉकच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी २१ कोटींचा निधी उपलब्ध होत नसल्याने हा स्वायवॉक अपूर्णवस्थेत राहण्याची शक्यता आहे.माहीम रेल्वे स्थानक ते धारावी जंक्शनपर्यंत वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी या मार्गावर स्वायवॉक उभारण्याचा निर्णय म्हाडाने घेतला़ त्यानुसार येथे स्कायवॉक बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे. पहिल्या टप्प्यात २६० मीटर लांबीचा स्कायवॉक बांधण्यात येत आहे. याचे ७५ टक्के काम पूर्ण झाले असून, तो मे महिन्यामध्ये खुला करण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिली. दुसऱ्या टप्प्यात ६४० मीटर लांबीचा स्वायवॉक उभारण्यात येणार आहे. यासाठी सुमारे ३५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. म्हाडाकडे सध्या १४ कोटींचा निधी उपलब्ध असल्याने या निधीतून पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी २१ कोटींचा निधी आवश्यक असून, तो म्हाडाला अद्याप मिळाला नसल्याने ६४० मीटर लांबीच्या स्कायवॉकचे काम लांबणार आहे. (प्रतिनिधी)
धारावी स्कायवॉकला मे महिन्याचा मुहूर्त?
By admin | Published: February 10, 2015 12:18 AM