Join us

धारावीला बीकेसीचा साज-मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 1:37 AM

एअरपोर्टच्या जागेवरील बाधीत झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन भविष्यात धारावीत करण्यात येईल

मनोहर कुंभेजकर मुंबई : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध असलेल्या धारावीचा चेहरा मोहरा बदलणार असून भविष्यात धारावीस बीकेसीचे रूप येणार आहे. राज्य सरकारच्या एसआरए योजनेला गती देण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारशी बातचीत करून धारावीतील रेल्वेची जागा ८०० कोटीला विकत घेतली आहे. याकामी पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी मोलाचे सहकार्य कार्य केले, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच विलेपार्ल्यात दिली.

अंधेरी पश्चिम येथील भाजपाचे आमदार अमित साटम यांच्या रोखठोक या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विलेपार्ले पश्चिम येथील नरसी मोनजी कॉलेजच्या सभागृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, एअरपोर्टच्या जागेवरील बाधीत झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन भविष्यात धारावीत करण्यात येईल. त्यामुळे १०० मोठी एकर जागा एअरपोर्टला मिळेल. तसेच जुहू एअरपोर्टच्या जागेवरील झोपड्यांचे पुनर्वसन धारावीतील एसआरए योजनेत केल्यानंतर येथे मोकळी जागा उपलब्ध होईल. त्यामुळे भविष्यात जुहू एअरपोर्टवरून छोट्या विमानांचे उड्डाण शक्य होईल. गेल्या ५ वर्षात मुंबईचा झपाटयाने विकास होत आहे. मुंबईत सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाचे जाळे, मोनो रेल्वे, कोस्टल रोड, वांद्रे-वरळी सी लिंक, शिवडी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर, नवी मुंबई विमानतळ यामुळे मुंबईचा चेहरामोहरा आगामी काळात बदलणार आहे. राज्य सरकरच्या पुढाकाराने आता अनेक आयटी हब मुंबईत उभे राहत असून ५ कोटी नवे रोजगार उपलब्ध होणार आहेत. वर्सोवा बीचला लवकरच नवा साज मिळणार आहे. मुंबईच्या समुद्रात रोज २१०० एमएलडी सांडपाणी सोडण्यात येते. याकडे राज्य सरकांरने लक्ष देऊन याचे खास नॉर्मस तयार करून घेतले. त्यामुळे मुंबईचा समुद्र आता प्रदूषित होणार नाही. दरम्यान, आमदार अमित साटम यांच्या मतदार संघातील नेहरू नगर, इंदिरा नगर आणि शिवाजी नगर येथील झोपडपट्यांचा सर्व्हे झाला असून येथे एसआरए योजना राबवून येथील सुमारे दहा हजार ते बारा हजार नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :देवेंद्र फडणवीस