धारावी निविदांची तारीख लांबणीवर

By admin | Published: January 19, 2016 04:02 AM2016-01-19T04:02:48+5:302016-01-19T04:02:48+5:30

धारावीतील झोपडीधारकांना ३५0 चौरस फुटांचे घर आणि प्रकल्पाच्या निविदा दोन आठवड्यात काढण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

Dharavi Tweezers Date | धारावी निविदांची तारीख लांबणीवर

धारावी निविदांची तारीख लांबणीवर

Next

मुंबई : धारावीतील झोपडीधारकांना ३५0 चौरस फुटांचे घर आणि प्रकल्पाच्या निविदा दोन आठवड्यात काढण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. घोषणेच्या दुसऱ्याच दिवशी धारावीमध्ये आयोजित केलेल्या सभेत गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांनी १९ जानेवारीला प्रकल्पाच्या निविदा काढण्याची घोषणा केली होती, परंतु निविदा तयार करण्याचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने गृहनिर्माणमंत्र्यांनी जाहीर केलेली तारीख लांबणीवर गेली आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीचा पुनर्विकास गेल्या अकरा वर्षांपासून रखडला आहे. सेना भाजपाचे सरकार सत्तेवर येताच, धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे भिजत पडलेले घोंगडे मार्गी लावले आहे, पण गृहनिर्माणमंत्र्यांनी जाहीर केलेली तारीख आली, तरी निविदा तयार करण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. निविदांच्या अटींमध्ये काही बदल करण्यात येत असून, ते महिना अखेरपर्यंत पूर्ण होईल, असे डीआरपी अधिकाऱ्यांनी सांगितले. धारावीकरांना ४00 चौरस फुटांचे घर मिळावे, यासाठी धारावी बचाव आंदोलनाच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची लवकरच भेट घेण्यात येणार आहे. या वेळी धारावी सेक्टर १ मधील चाळी आणि इमारतींमधील रहिवाशांना ७५0 चौरस फुटांचे घर देण्यात यावे, कारखाने आणि लहान उद्योगांनाही न्याय द्यावा, अशा विविध मागण्या करण्यात येणार असल्याचे, धारावी बचाव आंदोलनाचे नेते बाबुराव माने यांनी सांगितले, तसेच धारावी सेक्टर १ मध्ये चाळी आणि इमारती मोठ्या संख्येने आहेत. त्यांच्या विकासातून विकासकाला मोठा फायदा होणार असल्याने सेक्टर १ मधील चाळी आणि इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना ७५0 चौरस फुटांचे घर देण्यात यावे, अशी मागणीही रिपाइं नेते सिद्धार्थ कासारे यांनी केली आहे.

Web Title: Dharavi Tweezers Date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.