Join us

‘धारावीची दुसरी बीकेसी होऊ देणार नाही’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 10:33 AM

धारावीमध्ये दुसरी बीकेसी तयारी करून दिली जाणार नाही, असा इशारा धारावीकरांनी दिला आहे.

मुंबई : धारावी येथील नागरिकांच्या पुनर्वसनाकरिता राज्य सरकारने मुलुंड येथील जमिनीचा विचार केला असतानाच आता दुसरीकडे मिठागराच्या जमिनीचाही विचार केला जात आहे. मात्र, मुलुंड येथील जमीन किंवा मिठागराच्या जमिनीवर धारावीकरांचे पुनर्वसन होऊ देण्याचे स्वप्न कधीही पूर्ण होऊ दिले जाणार नाही आणि धारावीमध्ये दुसरी बीकेसी तयारी करून दिली जाणार नाही, असा इशारा धारावीकरांनी दिला आहे.

धारावी बचाव आंदोलनाच्या वतीने धारावी पुनर्विकासाविरोधात सातत्याने लढा दिला जात आहे. धारावीकरांचे पुनर्वसन धारावीतच झाले पाहिजे. धारावीकरांनी मागितलेल्या चौरस फुटाइतके घर धारावीकरांना मिळाले पाहिजे. धारावीतल्या प्रत्येक नागरिकाचे पुनर्वसन धारावीतच झाले पाहिजे, या आपल्या मुद्यांवर धारावीकर ठाम आहेत. 

 मुलुंड येथील डम्पिंगलगतची जमीन आणि जकात नाक्यालगतची जमीन; अशा दोन जमिनींचा वापर धारावीकरांच्या पुनर्वसनासाठी करण्याबाबत मध्यंतरी सरकारकडून महापालिकेला पत्र प्राप्त झाले होते. 

सोशल मीडियावर माेहीम सुरू :

हे पत्र प्राप्त होत नाही तोवर मिठागराच्या जमिनीचा वापरदेखील धारावीकरांच्या पुनर्वसनासाठी केला जाऊ शकतो, या मुद्द्याने जोर धरला आणि धारावीकर आणखी आक्रमक झाले. या दोन्ही जमिनींचा एकत्रित विचार केला, तर या जमिनी साडेतीनशे एकर एवढ्या आहेत. मात्र, या जमिनीशी धारावीकर यांना काही घेणे- देणे नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आता सोशल मीडियावर धारावी पुनर्विकासाविरोधात मोहीम छेडण्यात आली असून, २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी धारावीमध्ये यासंदर्भात सभा घेण्यात येणार असल्याची माहिती राजेंद्र कोरडे यांनी दिली.

टॅग्स :मुंबईधारावी