लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : धारावीतील तरुणाला ‘फोन पे’वर आलेल्या ५ हजारांंच्या कॅश बॅकसाठी ९५ हजार रुपये मोजावे लागले. याप्रकरणी धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धारावीत राहणारा आसिफ शेख (३०) या तरुणाचा गारमेंटचा व्यवसाय आहे. मंगळवाऱी दुकानात असताना, अनोळखी व्यक्तीने कॉल करून ‘फोन पे’मधून बोलत असल्याचे सांगितले. तसेच ‘फोन पे’वर ४ हजार ९९९ रुपयांचे कॅश बॅक आले असून, ते तुम्हाला हवे आहे का? अशी विचारणा केली. त्यांनी होकार देताच, मोबाईलवर नोटिफिकेशन आले. त्याखालील लिंकवर क्लिक करताच शेख याच्या खात्यातून एकूण ९५ हजार रुपयांचे व्यवहार झाले. त्यानंतर संबंधित क्रमांकावर त्याने संपर्क साधला असता, ताे बंद हाेता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्याने धारावी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे.
...............................