मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाहून राजकीय कलगीतुरा रंगला असतानाच दुसरीकडे धारावीमधील पात्र रहिवाशांना स्वतंत्र स्वयंपाकघर आणि शौचालये असलेले किमान ३५० चौरस फुटांचे घर देण्यात येणार असल्याची घोषणा अदानी समूह आणि सरकार यांच्यातील संयुक्त उपक्रम असलेल्या धारावी पुनर्वसन प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडने (डीआरपीपीएल) सोमवारी केली आहे.
धारावीकरांना मिळणाऱ्या घराचे क्षेत्रफळ हे मुंबईतील अन्य झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांतील घरांच्या तुलनेत १७ टक्के अधिक असल्याचा दावा कंपनीने केला आहे, तर अन्य प्रकल्पांत झोपडीधारकांना ३०० चौरस फुटांचे घर मिळते आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पात्र निवासी सदनिका म्हणजे १ जानेवारी २००० च्या आधी अस्तित्वात असलेल्या सदनिका आहेत.
धारावीकरांना नव्याने मिळणाऱ्या प्रत्येक फ्लॅटमध्ये स्वतंत्र स्वयंपाकघर आणि स्वतंत्र शौचालय असणार आहे. येथील वेगळी उद्योजकीय संस्कृती अबाधित ठेवून धारावीचा व्यावसायिक आणि औद्योगिक परिसर म्हणून पुनर्विकास केला जाणार आहे.