Join us

धारावीचे टेंडर रद्द करणार; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल; उद्योगपती अदानींवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 10:31 AM

भाषणादरम्यान उद्योगपती अदानींवर ठाकरेंनी हल्लाबोल केला. ही मुंबई आम्ही रक्त सांडून मिळविलेली आहे, अदानीने बक्षीस दिलेली नाही. त्यांना मुंबई विकली जात असताना मी गप्प बसणार नाही.

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येताच धारावी पुनर्वसनाचे टेंडर रद्द करणार असल्याचे उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. धारावीच्या मुद्द्यावरून त्यांनी दसरा मेळाव्यात राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.

भाषणादरम्यान उद्योगपती अदानींवर ठाकरेंनी हल्लाबोल केला. ही मुंबई आम्ही रक्त सांडून मिळविलेली आहे, अदानीने बक्षीस दिलेली नाही. त्यांना मुंबई विकली जात असताना मी गप्प बसणार नाही. मोदीजी! तुम्ही लोकसभा निवडणुकीत मंगळसूत्राचा विषय काढला होता. आता महाराष्ट्र लुटून त्याचे मंगळसूत्र अदानींच्या गळ्यात टाकणार आहात की अदानींचे मंगळसूत्र महाराष्ट्राच्या गळ्यात टाकणार आहात असा सवाल त्यांनी केला. धारावीमध्ये आपण पोलिसांना घरे देणार, मराठी माणसांना परत आणणार आणि वांद्रे शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांना तिथेच घरे देणार असे त्यांनी जाहीर केले.

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात पहिल्यांदाच भाषण झाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची नक्कल करत घोटाळ्यांचे अनेक आरोप केले.

घोटाळेबाजांना तुरुंगात टाकू' एक महिन्यात आमचे सरकार येईल, तेव्हा घोटाळेबाजांच्या फायली आम्ही काढू. घोटाळ्यातील मंत्री, अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकू. मुंबई महापालिकेत गेल्यावर्षी सहा हजार कोटींचा रस्ते घोटाळा मी उघड केला होता, यावर्षीही पाच हजार कोटींचा घोटाळा सुरू आहे, आयुक्तांनी एकाही कंत्राटदाराच्या फाईलवर सही केली तर याद राखा! जेलमध्ये राहायचे की बाहेर ठरवा, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला. नोकऱ्या देणे हा आमच्या सरकारचा एकमेव प्राधान्यक्रम असेल, असे ते म्हणाले.

आझाद मैदानात चोरांची आळंदी एक चिगारी काफी है, मशाल जलाने के लिए, एक मशाल काफी है ज्वालामुखी उठाने के लिए, आज इथे मशाली पेटल्या आहेत. महाराष्ट्र इतक्या संकटातही ठाकरे यांच्याच मागे उभा राहिला. इथे देवाची आळंदी आहे, तर चोरांची आळंदी आझाद मैदानात आहे. तेथे व्यासपीठावरील सगळे मोदींचे गुलाम आहेत. त्यांच्या पक्षाचा जन्म महाराष्ट्रात नाही तर सुरतच्या गर्भात झाला आहे. आपले सरकार दोन महिन्यांनी महाराष्ट्रात येणार आहे. तोपर्यंत जगलात वाचलात तर तुमचा मेळावा सुरतला घ्यावा लागेल. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोदी आणि शाह यांचा दारुण पराभव केला. त्यामुळे हा विजय मेळावा आहे. - संजय राऊत, नेते, उद्धवसेना

सरकारवर कुणाचाही विश्वास नाही राज्यात आलेले सरकार विश्वासघात करून आले आहे. त्यामुळे ते सर्वांचाच विश्वासघात करणार. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायाला स्पर्श करून म्हणाले, कोर्टात टिकणारे मराठा आरक्षण देणार, त्याचे काय झाले? दोन-चार दिवसांत आचारसंहिता लागेल. मग, आहे कुठे सरकार? चार दिवसांपूर्वी सत्ताधारी आदिवासी आमदार यांनी मंत्रालयात उड्या मारल्या. कुणाचाही या सरकारवर विश्वास नाही. राज्याचे गृहमंत्री म्हणतात, विरोधक नॅरेटिव्ह पसरवतात, पण देशाचे गृहमंत्री सांगतात विरोधकांना रस्त्यावर फोडून काढा. खरे तर हेच भाजपचे नॅरेटिव्ह आहे. - भास्कर जाधव, नेते 

बेक्कार क्रेडिट घेऊ नका १५०० रुपये मिळतात ते फडणवीस यांनी नागपूरचा बंगला विकून, शिदेंनी तापोळ्याची जमीन विकून दिलेले नाहीत. हे पैसे आमच्या कष्टाचे आहेत. नागरिकांनी टॅक्स भरला ते पैसे आहेत. तुम्ही पोस्टमन आहात. बेक्कार क्रेडिट घेऊ नका. आपण बहिणीच्या घरी गेल्यावर तिला पैसे देतो तेव्हा बॅनर लावतो का? मात्र, हे बॅनर लावून बहिणींची थट्टा करत आहेत. आचारसंहिता लागेल, पण आमचा न्याय अजून झाला नाही. आता झाला तर काय कामाचा? ऑपरेशन इज सक्सेस बट पेशंट इज डेड अशी अवस्था आहे. 'मी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे वाक्य ऐकण्यासाठी लोक आतुर आहेत. त्यामुळे ही मशाल पेटत ठेवा. - सुषमा अंधारे, नेत्या

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेना