धारवली पूलाचे रुपडे पालटणार! पुनर्बांधणीला एमसीझेडएमची मान्यता
By मनोहर कुंभेजकर | Published: May 7, 2023 08:18 PM2023-05-07T20:18:21+5:302023-05-07T20:18:40+5:30
या पूलापासून सुमारे 3-4 किमी अंतरावर असलेले मढ हे पर्यटन स्थळ व शूटिंग साठी म्हणून ओळखले जात असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते.
मुंबई : मढ बेटाला मुंबईशी जोडणारा धारवलीचा पूल गेल्या सुमारे 77 वर्षापासून उपेक्षित होता.आता या महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणने (एमसीझेडएम) दि. 12 एप्रिल रोजी झालेल्या 166 व्या बैठकीत या पूलाच्या संरेखनास मान्यता दिल्याने पूलाच्या पुनर्बांधणी व रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे भविष्यात या पूलाचे रुपडे पालटणार आहे.
या पूलापासून सुमारे 3-4 किमी अंतरावर असलेले मढ हे पर्यटन स्थळ व शूटिंग साठी म्हणून ओळखले जात असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते.तसेच सुमारे 150 मीटर ते 200 मीटर लांब आणि सुमारे 27.5 मीटर असलेल्या या रुंद पूलामुळे येथे विरुद्ध दिशेने समोर आलेली वाहने पास होवू शकत नाही. मढ आणि परिसराची लोकसंख्या गेल्या 25 ते 30 वर्षात कमालीची वाढल्याने या पूलाचे रुंदीकरण देखिल महत्वाचे होते.
तसेच पूलाचे स्टील झिजल्याने महाड सारखी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने त्यामुळे या पूलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याची पुनर्बांधणी व रुंदीकरण करण्याची मागणी मढ येथील सामाजिक कार्यकर्ते अँड.विक्रम कपूर यांनी स्थानिक आमदार अस्लम शेख व पी उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे 2016 पासून सातत्याने केली होती.तर पालिका प्रशासन,एमसीझेडएमकडे आमदार अस्लम शेख यांनी पाठपुरावा केला होता.
सदर पूलाच्या बांधकामामुळे खारफुटीचा परिसर बाधित होणार असल्याने या पूलाच्या पुनर्बांधणी व रुंदीकरण करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने एमसीझेडएम कडे रितसर परवानगी मागितली होती.अखेर एमसीझेडएमने दि. 12 एप्रिल रोजी झालेल्या 166 व्या बैठकीत या पूलाच्या संरेखनास मान्यता दिली आहे, अशी माहिती अॅड. विक्रम कपूर यांनी 'लोकमत'ला दिली. त्यामुळे या पूलाच्या पुनर्बांधणी व रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला असून या पूलाचे रुपडे बदलणार असून रुंदी सुद्धा 90 मीटर होईल, असा विश्वास अॅड. विक्रम कपूर यांनी व्यक्त केला.