धर्मा पाटील यांच्या आत्महत्याप्रकरणी दोषींविरोधात ३०२ दाखल करा! - राधाकृष्ण विखे-पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 15:33 IST2018-01-29T14:40:32+5:302018-01-29T15:33:34+5:30
भूसंपादनाची कारवाई सुरू असताना मंत्र्यांनी जमीन खरेदी केलीच कशी? -राधाकृष्ण विखे-पाटील

धर्मा पाटील यांच्या आत्महत्याप्रकरणी दोषींविरोधात ३०२ दाखल करा! - राधाकृष्ण विखे-पाटील
मुंबई - धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांची आत्महत्या नसून, तो सरकारी अनास्थेने घेतलेला बळी आहे. त्यामुळे त्यांना वेळीच न्याय का मिळाला नाही,याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींविरूद्ध ३०२ दाखल करा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
धर्मा पाटील यांच्या निधनानंतर पत्रकारांशी बोलताना विखे पाटील यांनी सरकारवर जळजळीत टीका केली. ते म्हणाले की, धर्मा पाटील यांनी विषप्राशन केल्यानंतर सरकारने वाढीव अनुदान देण्याची घोषणा केली. एका वयोवृद्ध शेतकऱ्याने आपला जीव धोक्यात घातल्यानंतर सरकारला जाग येते. मग त्यापूर्वी हे सरकार झोपले होते का, अशीही संतप्त विचारणा त्यांनी केली. धर्मा पाटील यांच्या मृत्युप्रकरणाची तातडीने चौकशी होऊन संबंधितांविरूद्ध फौजदारी कारवाई सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
धुळे जिल्ह्यातील वीजनिर्मिती प्रकल्पाच्या भूसंपादनामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असताना तत्कालीन आमदार व एक विद्यमान मंत्री प्रकल्पात गेलेली जमीन खरेदी करतात. आपले राजकीय वजन वापरून तातडीने जमिनीची खातेफोडही करून घेतात. मात्र त्याचवेळी धर्मा पाटील सारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याला प्रशासनाकडे हेलपाटे मारून अखेर मंत्रालयात विषप्राशन करावे लागते, हे सरकारचे मोठे अपयश असल्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.