मुंबई : मुंबई शहरासह उपनगरात शनिवारी गणपती बाप्पाचे धूमधडाक्यात आगमन झाले. मुंबईतील नामांकित गणपतींपैकी एक असलेल्या ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’च्या मूर्तीच्या आगमनासाठी या वेळी लालबाग परिसरात प्रचंड गर्दी उसळली होती. विशेषत: तरुणाईने मोठ्या संख्येने गर्दी करीत ढोल-ताशांच्या तालावर ताल धरला होता.चिंचपोकळी, करी रोड आणि परळ येथील कार्यशाळांमधून मोठ्या संख्येने गणेशमूर्ती शनिवारी मंडपाच्या दिशेने रवाना झाल्या. दुपारी १२च्या सुमारास करी रोडच्या भारतमाता येथील खातूंच्या कार्यशाळेतून चिंतामणीचा आगमन सोहळा सुरू होणार होता. मात्र सकाळपासूनच शेकडो तरुण, तरुणींसह मोठ्या संख्येने फोटोग्राफर येथे जमा झाले होते. चिंतामणीची एक झलक टिपण्यासाठी तरुणाईने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गामधील सौंदर्यीकरणाचाही ताबा घेतला होता. मात्र, १२ वाजता निघणारा चिंतामणी काहीशा उशिराने निघाल्याने अखेर पोलिसांना काही काळासाठी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करावा लागला. पोलीस उपायुक्त एन. अंबिका यांनी चिंतामणीचे आशीर्वाद घेतल्यानंतर चिंतामणीच्या आगमन सोहळ्यास सुरुवात झाली.चिंतामणीच्या पाठोपाठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरून दक्षिण मुंबईकडे रवाना झालेला पहिल्या सुतार गल्लीतील ‘बाप्पा राजा’च्या आगमन सोहळ्यात ढोल पथकाच्या तालावर उपस्थित तरुणाई बेधुंद होऊन नाचताना दिसली. तर दुसऱ्या मार्गाने उपनगराकडे निघालेल्या अंधेरी पश्चिमेकडील आधार गणेश मित्र मंडळाच्या ‘विश्वाचा राजा’ गणेशमूर्तीने सर्वांचे लक्ष वेधले. नंदीच्या डोक्यावर स्वार झालेल्या या गणेशमूर्तीचे छायाचित्र काढण्यासाठी छायाचित्रकारांची झुंबड उडाली होती.प्रभावळीत ब्रह्मांडमूर्तिकार रेश्मा खातू यांनी साकारलेल्या ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’मागे असलेल्या प्रभावळीने भाविकांना आश्चर्याचा धक्का दिला. ब्रह्मदेव, महेश व महेशासह गंगा, सरस्वती आणि लक्ष्मीच्या प्रतिकृती असलेल्या प्रभावळीमुळे विष्णू रूपातील चिंतामणीची मूर्ती चर्चेचा विषय ठरली.>...म्हणून कार्यकर्ते भाव खाऊन गेले!आगमन सोहळ्यांत प्रत्येक मंडळातील कार्यकर्त्यांनी स्वत:चे एकसारखेच टी-शर्ट व गळ्यात ओळखपत्र घातले होते. त्यामुळे प्रत्येक मंडळातील कार्यकर्ते आगमन सोहळ्यांत आपली छाप सोडून जात होते.या वेळी ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ मंडळाने छापलेले टी-शर्ट कार्यकर्त्यांसह उपस्थित गणेशभक्तांनी परिधान केल्याचे दिसले.
चिंचपोकळीच्या चिंतामणीसह गणरायाच्या आगमनांचा धूमधडाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 6:22 AM