राजू भिसे ल्ल नागोठणेधरमतर खाडीच्या बाजूला वसलेल्या शहाबाज ते गणेशपट्टी व पेण तालुक्यातील डोलवी ते भाल या भागातील शेतकऱ्यांची भातशेतीच भविष्यात संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. धरमतर खाडीच्या दोन्हीबाजूच्या बंदिस्तीवर या भागातील भातशेती अवलंबून आहे. मात्र खाडीतून जाणाऱ्या जेएसडब्लू आणि पीएनपी कंपनीच्या महाकाय बोटींच्या तडाख्याने बंदिस्तीला तडे गेलेले आहेत. त्यामुळे भातशेतीत समुद्राचे खारे पाणी घुसून शेती यापुढे संपण्याच्याच मार्गावर आली आहे. धरमतर बंदरात भाऊचा धक्का ते धरमतर ही जलवाहतूक साधारणत: ऐंशीच्या दशकात बंद झाली, तर मंगलोरी कौलांची वाहतूक मात्र चालूच आहे. १९९४ मध्ये पूर्वीची निप्पॉन (आताची जेएसडब्लू) या कंपनीची कच्च्या लोखंडाची वाहतूक या बंदरातूनच चालू झाली. ती सुरू होण्यापूर्वी येणाऱ्या बोटींचा मार्ग सुकर करण्यासाठी धरमतर खाडीची पेण बाजूकडील १३५ मीटर रुंदीच्या भागाची खोली ड्रेझिंगद्वारे सहा मीटरने वाढविण्यात आली. ही खोली वाढविण्यासाठी ड्रेझिंग करताना खाडीच्या किनाऱ्याचा नैसर्गिक भराव व त्यावर असलेली कांदळवनाची झाडे कोसळल्यामुळे या महाकाय बोटींच्या लाटांचा तडाखा थेट या खारबंदिस्तीला बसू लागला. १९९९ मध्ये धरमतर खाडीच्या पश्चिमेस रेल्वे पुलाला लागून पीएनपी जेटी अस्तित्वात आली. या जेटीद्वारे कोळसा वाहतूक करण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी ८ सप्टेंबर १९९८ रोजी तसेच कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागांनीही याच तारखेला आणि खारभूमी विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी ११ सप्टेंबर १९९८ रोजी ना हरकत दाखले दिले. मेरीटाईम बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही १० डिसेंबर १९९९ रोजी धरमतर व वर्सोवा या दोन बंदरांतील गाळ काढून खाडीची खोली वाढविण्यासाठी जाहिरातही प्रसिद्ध केली होती. त्यात धरमतरसाठी १३ कोटी ५१ लाख ३५ हजार एवढा खर्च ठरविण्यात आला होता. या कामाचा ठेका हैदराबादच्या धरती कन्स. कंपनीला मिळून पाच भागांत एकूण १३,८५९ मीटर लांबीच्या खाडीची खोली पश्चिम बाजूस वाढविण्यात आली. या कामासाठी मेरीटाईम बोर्डाला ११ कोटी ८९ लाख ७४ हजार ६४० रु पये इतका खर्च आला. मात्र रॉयल्टीची १ कोटी ४० लाखांची रक्कम कापून घेण्यास मेरीटाईम बोर्ड विसरल्याने शासनाचा महसूल बुडविला गेला आहे.आरटीआय कार्यकर्ते रजनीकांत पाटील यांनी या प्रकरणाची माहिती घेऊन विषयाला हात घातला आहे. धरमतर खाडीच्या पूर्वेस वावे-वडखळ ते उर्णोली अशी चौदा किलोमीटर, तर पश्चिमेस शहाबाज ते गणेशपट्टी (मोठे शहापूर वगळून) अशा बारा किलोमीटर लांबीच्या खारभूमी विभागाच्या शासकीय योजना आहेत. पूर्वीच्या निप्पोन कंपनीच्या मालवाहू बोटी खाडीच्या पूर्वेकडून तर पीएनपीच्या बोटी पश्चिमेकडून येण्या-जाण्याचे मार्ग मेरीटाईम बोर्डाकडून निश्चित करण्यात आले आहेत. या बोटींमुळे खारबंदिस्तीला फटका बसत आहे. दिवसेंदिवस या महाकाय बोटींची संख्या वाढणारच असल्याने तडाखा कमी होण्याची सुतराम शक्यता नाही, उलट लाटांची तीव्रता वाढत जाऊन दोन्ही बाजूंच्या खारबंदिस्तीला तडा जाणार आहे. भाताचे कोठार असलेल्या पेण व अलिबाग तालुक्यातील खलाट्या कायमस्वरूपी नापीक होण्याच्या मार्गावर आहेत. मेरीटाईम बोर्डाकडून धरमतर खाडीचा गाळ उपसताना खारभूमी विभाग तसेच स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्यामुळेच त्याचे दुष्परिणाम शेतकरी तसेच नागरिकांना नाहक भोगावे लागत असल्याची खंत रजनीकांत पाटील यांनी व्यक्त केली.
धरमतरची भातशेती धोक्यात
By admin | Published: March 28, 2015 10:26 PM