"माझ्या सिनेमात अनेकांचे खरे चेहरे..."; ‘धर्मवीर २’ ट्रेलर लाँचवेळी फडणवीसांचे सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 01:11 PM2024-07-21T13:11:13+5:302024-07-21T13:37:48+5:30
धर्मवीर २ – साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…’ या चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी मुंबईत प्रदर्शित करण्यात आला.
Dharmaveer 2 Trailer Launch : आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेला 'धर्मवीर २' सिनेमाचा ट्रेलर शनिवारी प्रदर्शित झाला. 'साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' अशी या सिनेमाची टॅगलाइन आहे. या ट्रेलर लाँचसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सिनेसृष्टीतील दिग्गजांची उपस्थित होते. प्रवीण तरडे दिग्दर्शित या सिनेमात प्रसाद ओक आणि क्षितिज दाते हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान, यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण देखील एक चित्रपट काढणार असल्याचं म्हटलं आहे.
मला देखील एक सिनेमा काढायचा आहे. मी जेव्हा सिनेमा काढेन, तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटले जातील, अनेकांचे खरे चेहरे समोर येतील, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘धर्मवीर २’ च्या ट्रेलर प्रदर्शनाच्या कार्यक्रमात केले. 'धर्मवीर २' सिनेमात अनेक गोष्टींचा उलगडा होणार असल्याचं ट्रेलरमधून सांगण्यात येत आहे. त्यामुळं आनंद दिघेंच्या मृत्यूचं गूढ, एकनाथ शिंदेंच्या बंडाची गोष्ट अशा अनेक गोष्टींचा उलगडा या ट्रेलरमधून मिळणार का? याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. अशातच फडणवीस यांनी केलेल्या विधानामुळे आणखी चर्चांना उधाण आलं आहे.
धर्मवीर २ कुठपर्यंत आला आहे हे मला माहिती नाही. पण जर आतापर्यंत आला असेल माझाही त्यात थोडासा रोल असायला हवा. माझा रोल धर्मवीर तीनमध्ये येईल. मला देखील एक सिनेमा काढायचा आहे. पण मला जो सिनेमा काढायचा आहे त्याला अजून वेळ आहे. कारण मी जेव्हा सिनेमा काढेल तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटले जातील आणि अनेकांचे खरे चेहरे समोर येतील. योग्य वेळ आल्यावर तो सिनेमा देखील मी काढेल.
"धर्मवीर सिनेमा ज्यांनी ज्यांनी पाहिला, त्यांना या सिनेमाने चेतवले. सिनेमा ज्यावेळी प्रदर्शित झाला, तेव्हा याचा भाग दोन येईल, हे कुणाला माहीत नव्हते. चित्रपटाबरोबरच शिंदे यांच्या जीवनाचा भाग दोन येईल, याचीही कुणाला कल्पना नव्हती. पण तोही भाग दोन लवकरच सुरू झाला. आनंद दिघे यांच्या शिकवणुकीप्रमाणे शिंदे यांनी ज्याप्रकारे आज महाराष्ट्राची धुरा सांभाळली आहे. ते पाहता आनंद दिघे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे स्वर्गातून त्यांना आशीर्वादच देत असतील. कारण या दोघांनाही विचारांची गद्दारी मान्य नव्हती," असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"पण ज्यावेळी आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या लोकांची ताकद पाठीशी असते, तेव्हा कितीही हिणवले गेले, तरीदेखील खरे सोने काय आहे, हे महाराष्ट्राची जनता हेरते आणि शिंदे यांचे नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारले," असं फडणवीस यांनी म्हटलं.