मुंबई: दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर ४ दिवस उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. ब्रीच कँडी रुग्णालयानं याबद्दलची माहिती दिली.
धर्मेंद्र यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली होती. चार दिवसांपूर्वी ते उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर धर्मेंद्र यांनी एक व्हिडीओ जारी केला. मांसपेशी ताणल्या गेल्यानं रुग्णालयात दाखल व्हावं लागलं होतं, अशी माहिती धर्मेंद्र यांनी दिली.
थोड्याच वेळापूर्वी धर्मेंद्र यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला. कशाचाही अतिरेक करू नका, असा सल्ला त्यांनी दिला. 'मित्रांनो, कोणतीही गोष्ट जास्त करू नका. मी केली आणि मला त्रास झाला. एक मांसपेशी ताणली गेली. त्यामुळे रुग्णालयात जावं लागलं. दोन-चार दिवस कठीण गेले. पण आता मी ठीक आहे,' असं त्यांनी सांगितलं.
धर्मेंद्र यांनी त्यांच्या चाहत्यांचे आभार मानत त्यांना मोलाचा सल्लादेखील दिला. 'मी घरी परतलो आहे. तुमच्या प्रार्थना कामी आल्या. देवाचा आशीर्वाद होता. कोणतीही गोष्ट जास्त करू नका. मी आता स्वत:ची काळजी घेईन', असं धर्मेंद्र यांनी व्हिडीओच्या शेवटी म्हटलं.