धसका, आधार आणि भिस्त..., सेनेची दिलजमाई सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 12:56 AM2019-04-19T00:56:18+5:302019-04-19T00:56:48+5:30

उत्तर पूर्व मुंबईतही युती विरुद्ध आघाडीत चुरशीची लढत होणार आहे.

Dhaska, Aadhaar and Bhista ..., Sena's heartbeats continue | धसका, आधार आणि भिस्त..., सेनेची दिलजमाई सुरूच

धसका, आधार आणि भिस्त..., सेनेची दिलजमाई सुरूच

Next

- मनीषा म्हात्रे 
मुंबई : उत्तर पूर्व मुंबईतही युती विरुद्ध आघाडीत चुरशीची लढत होणार आहे. मतदारसंघात सात लाखांहून अधिक असलेले मराठी मतदार भाजपचे मनोज कोटक आणि राष्ट्रवादीचे संजय पाटील यांचे भवितव्य ठरवणार आहेत. साहजिकच ही मराठी व्होटबँक काबीज करण्यासाठी कोटक यांना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेची नितांत गरज आहे. दुसरीकडे नरेंद्र मोदींविरोधात, युतीच्या उमेदवारांविरोधात आक्रमक भूमिका घेत राज्यभर जाहीर सभा घेणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाचा पाटील यांना अप्रत्यक्ष आधार आहे.
ईशान्य मुंबईत एक खासदार, पाच आमदार, २८ नगरसेवक, शिवाय लाखभर पदाधिकारी आणि पूर्णवेळ कार्यकर्ते अशी बळकट बांधणी युतीकडे आहे. त्या तुलनेत आघाडीकडे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही लोकप्रतिनिधी नाहीत. २००९ मध्ये राज ठाकरेंच्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होत मनसेचे तीन आमदार आणि नगरसेवक येथून निवडून आले होते. लोकसभा निवडणुकीत मनसेने सुमारे दोन लाख मते घेत युतीला धक्का दिला होता. मात्र गेल्या दहा वर्षांमध्ये मनसेची वाताहत झाली. तरीही ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत मनसेने घेतलेल्या भूमिकेने युतीच्या विशेषत: मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने धसका घेतला आहे.
भूमिकेप्रमाणे मनसेचे स्थानिक पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते पाटील यांचा उघड प्रचार करताना दिसतात. काहींनी हक्काच्या इलाख्यात छुप्या बैठका घेत पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यास सुरुवात केली आहे. महाआघाडीत काँग्रेस वगळता या मतदारसंघात अन्य पक्षांची ताकद फारशी नाही. त्यामुळे पाटील यांची सर्व मदार वैयक्तिक संपर्कावर अधिक आहे.
कोटक यांच्या प्रचारात शिवसेनेचे विभागप्रमुख रमेश कोरगावकर जितकी मेहनत घेत आहेत तितकी अन्य नेते, पदाधिकारी घेताना दिसत नाहीत. सेना आमदार अशोक पाटील बैठकांमध्ये दिसतात. मात्र प्रत्यक्ष मतदारांपर्यंत जात नाहीत. शिशिर शिंदे गेल्या दोन दिवसांपासून युतीच्या प्रचारात दिसू लागले आहेत.
विक्रोळीचे आमदार सुनील राऊत, अशोक पाटील यांनी खासगी कार्यक्रमात पाटील यांना दिलेल्या शुभेच्छा अद्यापही समाज माध्यमातून ईशान्य मुंबईत फिरत आहेत. सेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी राज्यातील आधीच्या टप्प्यात होणाºया निवडणुकांच्या प्रचारार्थ शहराबाहेर आहेत.
>सेना, रिपाइं कार्यकर्तांचा प्रचार
मित्रपक्ष जोमाने आणि उत्साहाने सहभागी आहे. उमेदवाराशिवाय घरोघरी जाऊन सुरू असलेल्या प्रचारात, भाजपपेक्षा एक पाऊल पुढे जात शिवसेना आणि रिपाइंचे कार्यकर्ते प्रचार करत आहेत. ही समाधानाची बाब आहे.
- मनोज कोटक, भाजप
>प्रत्येकाने धर्म पाळला तरच प्रचार
महायुतीचा धर्म, पक्ष प्रमुखांचे आदेश मी पाळतो आहे. प्रत्येकाने हा धर्म पाळला तर इतर मतदारसंघात
शिवसेना उमेदवारासाठी भाजप कार्यकर्ते त्याच जिद्दीने प्रचार
करतील.
- रमेश कोरगावकर, शिवसेना
>मित्रपक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी दिवस रात्र एक करत मनापासून प्रचारात उतरला आहे. त्यांच्या प्रयत्नांना नक्कीच यश येईल.
- संजय पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस
>आजही कॉंग्रेसबरोबर अन्य पक्षाचे अनेक वरिष्ठ नेतेमंडळी कार्यरत आहेत. आणि ते जोमाने प्रचार करत आहेत. स्थानिक पातळीवर आम्ही सगळे एकत्र प्रचार करत आहोत.
- चरणसिंग सप्रा, कॉंग्रेस राष्ट्रीय प्रवक्ते

Web Title: Dhaska, Aadhaar and Bhista ..., Sena's heartbeats continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.