धवलसिंह मोहितेंची शिवसेनेतून हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 06:09 AM2019-03-22T06:09:29+5:302019-03-22T11:56:38+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश करताच त्यांचे चुलत भाऊ आणि कट्टर विरोधक डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी लगेचच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश करताच त्यांचे चुलत भाऊ आणि कट्टर विरोधक डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी लगेचच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
राष्ट्रवादीचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे भाजपात दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तत्काळ भेट घेणारे शिवसेनेचे नेते धवलसिंह मोहिते-पाटील यांची शिवसेनेने पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याने त्यांची हकालपट्टी केल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
धवलसिंह हे रणजितसिंह यांचे चुलत भाऊ आहेत. पण दोन्ही कुटुंबांमध्ये सलोख्याचे संबंध नाहीत. माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे कनिष्ठ बंधू माजी सहकार राज्यमंत्री दिवंगत प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे धवलसिंह हे पुत्र आहेत. धवलसिंह यांनी काही वर्षांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. मध्यंतरी त्यांच्याकडे सहसंपर्क पदही देण्यात आले होते.
रणजितसिंह यांनी बुधवारी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर धवलसिंह यांनी त्वरीत शरद पवार यांची भेट घेतली होती. शरद पवार आणि धवलसिंह यांच्यात सुमारे तासभर बंद खोलीत चर्चा झाली. धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही उपस्थित होते.
त्यानंतर धवलसिंह यांनी अकलूज येथे आज (गुरुवार) समर्थकांची बैठक घेतली. बैठकीत राष्ट्रवादीत जाण्याचा समर्थकांचा सूर दिसून आला.