लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: सुमारे १७ बँकांकडून घेतलेल्या ४२ हजार ८१७ कोटी रुपयांच्या कर्जापैकी तब्बल ३४ हजार कोटी रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी सीबीआयने मंगळवारी डीएचएफएल कंपनीचा संचालक धीरज वाधवान याला अटक केली आहे. सोमवारी सायंकाळीच सीबीआयच्या अधिकाऱ्याने त्याला मुंबईत ताब्यात घेतले होते.
दिल्ली न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. युनियन बैंक प्रणित अन्य १७ बँकांकडून या कर्जाची उचल केल्यानंतर या कर्जातील मोठ्या रकमेचा धीरज वाधवान आणि त्याचा भाऊ कपिल वाधवान यांनी या पैशांचा अपहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यानंतर, सीबीआयने या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर डीएचएफएलच्या व्यवहारांत अधिकाऱ्यांनी घोटाळा झाल्याचे आढळून आले, तसेच तब्बल ३४ हजार ६१५ कोटी रुपये लंपास केल्याचे लक्षात आले.
याचप्रकरणी २०२२ मध्ये सीबीआयने वाधवान याच्या विरोधात आरोपपत्रही दाखल केले होते. त्यावेळी त्याला सीबीआयने अटक केली होती. मात्र, त्यानंतर त्याला जामीन मंजूर झाला होता. दरम्यान, येस बँकेतील घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने यापूर्वीही धीरज वाधवान याला अटक केली होती. त्यानंतर, त्याला जामीन मंजूर झाला होता.