मुंबई : प्रदूषण आणि धूळ कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले असून, या मोहिमेंतर्गत मुंबईतील ६०० किमीचे रस्ते रोज एक दिवसआड धुतले जात आहेत. त्यासाठी आतापर्यंत तब्बल १२ लाख ३३ हजार ५० लिटर पाण्याचा वापर झाला आहे, तर चार लाख ५६ हजार टन धूळ नष्ट करण्यात आली आहे.
प्रदूषण कमी करण्यासाठी, धूळ खाली बसवण्यासाठी रस्ते धुण्याचा कार्यक्रम पालिकेने हाती घेतला आहे. ६०० किमीचे रस्ते एक दिवसआड धुण्याचे नियोजन आहे. सध्या संपूर्ण मुंबईत टँकर आणि फवारणी करणारी १६२ वाहने तैनात करण्यात आली आहेत. प्रत्येक विभागाच्या गरजेनुसार पाण्याची फवारणी होत आहे. मुख्य रस्ते धुण्याचे काम मात्र प्रत्येक विभागात सुरू आहे.
मोठ्या प्रमाणावर रस्ते धुतले जात असल्याने टँकरची मोठी गरज निर्माण झाली आहे. काही विभागात पालिकेचे टँकर आहेत. शिवाय खाजगी टँकर भाड्यानेही घ्यावे लागत आहेत. एका टँकरला एका फेरीला साधारण तीन ते साडेतीन हजार रुपये खर्च येतो. दिवसातून तीन ते चार टँकर मागवावे लागतात, अशी माहिती ‘एस’ विभागातील एका अधिकाऱ्याने दिली.
तलाव-विहिरी आणि पुनर्प्रक्रिया पाण्याचा वापर
टँकरसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात नाही. पालिकेचे पुनर्प्रक्रिया केंद्रातून पाणी आणले जाते. शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी अशी केंद्रे आहेत. त्याशिवाय शहर आणि उपनगरातील तलाव तसेच विहिरीतून पाण्याचा उपसा केला जात आहे. बाणगंगा तलाव, दादर, चारकोप, कुलाबा, अंधेरी, कांदिवली येथील विहिरी- तलावातील पाणी वापरले जात आहे, असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले.
मुंबईत विशेषकरून दक्षिण मुंबईत जुन्या विहिरी मोठ्या प्रमाणावर आहेत. काही प्रमाणत बोअरवेलही आहेत. या विहिरी आणि बोअरवेल याक्षणी मोठ्या प्रमाणावर साहाय्यभूत ठरत आहेत.
आणखी टँकरची भरआणखी एक हजार टँकर रस्ते धुण्यासाठी वापरा अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यानुसार पालिकेने नियोजन सुरू केले आहे. विभाग स्तरावर गरजेनुसार नियोजन केले जात आहे. मात्र टँकर कमी पडण्याची शक्यता असल्याने मुंबई बाहेरून टँकर मागवण्याची वेळ येऊ शकते.
मुंबईत वाढणाऱ्या प्रदुषणामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरित उपाययाेजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पालिकेच्या सर्वच यंत्रणा कामाला लागल्या असून, मरीन ड्राइव्ह येथे पालिका कर्मचाऱ्यांनी रस्ता धुवून काढला. शहर व उपनगरांमध्ये पालिकेने युद्धपातळीवर स्वच्छता माेहीम सुरू केली आहे. (छाया : दत्ता खेडेकर)