गुजरातमध्ये घुमणार महाराष्ट्रातील ढोल-ताशा

By admin | Published: March 18, 2016 12:16 AM2016-03-18T00:16:25+5:302016-03-18T00:16:25+5:30

तरुणाईची ऊर्जा, त्या ऊर्जेने ढोल-ताशा वाजविणारे हात, त्यातून घडणाऱ्या मराठी अस्मितेचे दर्शन अशा महाराष्ट्राची कला प्रत्येकाला मोहात पाडायला लावणारी आहे.

Dhol-Tasha in Maharashtra will move in Gujarat | गुजरातमध्ये घुमणार महाराष्ट्रातील ढोल-ताशा

गुजरातमध्ये घुमणार महाराष्ट्रातील ढोल-ताशा

Next

- प्राची सोनवणे,  नवी मुंबई
तरुणाईची ऊर्जा, त्या ऊर्जेने ढोल-ताशा वाजविणारे हात, त्यातून घडणाऱ्या मराठी अस्मितेचे दर्शन अशा महाराष्ट्राची कला प्रत्येकाला मोहात पाडायला लावणारी आहे. गेली चार वर्षे ऐरोलीतील ‘नादगर्जा’ ढोल-ताशा पथकाद्वारे विविध ताल सादर केले जात असून, अहमदाबाद येथे रविवारी लाइव्ह परफॉर्मन्स होणार आहे. महाराष्ट्राच्या ढोल-ताशा संस्कृतीचा गजर ऐकण्याची संधी गुजराती बांधवांना मिळणार आहे.
नादगर्जा या पथकात ६० हून अधिक सदस्य कार्यरत असून जोरदार सराव सुरु आहे. बऱ्याचदा सराव करतानाच एखादा नवीन ताल सापडतो तर काही वेळेस मागील चुका दुरुस्त करण्याची संधी मिळत असल्याची माहिती पथकातील सदस्यांनी दिली. महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राबाहेर सादर करणारे हे शहरातील पहिलेच पथक असून यामध्ये कोणतीही मिरवणूक किंवा कोणतीही सुपारी नसल्याची माहिती पथकाचा प्रमुख निखील चौधरी याने दिली. शेजारील राज्यात राहणाऱ्या मराठी माणसाला आपली संस्कृती दाखवण्यासाठी हा खटाटोप आहे. या दोन गोष्टींच्या बळावर नादगर्जा पथक अहमदाबादमध्ये मराठीचा झेंडा फडकविणार असल्याचे निखीलने सांगितले. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हे वादन कोणत्याही सोहळ्याचा श्री गणेशा करणारा नसून १८ हजारांहून अधिक प्रेक्षकांसमोर ४० मिनिटांचा ढोल-ताशांचा नाद घुमणार आहे. मराठमोळा ठेका, डौलात नाचणारा भगवा, ताशाची तर्रर्र यांनी ताल धरायला भाग पाडूच असा विश्वास पथकाने व्यक्त केला आहे.

नवीन वर्ष स्वागतासाठी नवी मुंबईतील पथक सज्ज
खारघरमधील ‘उत्सव’ ढोल-ताशा पथक यंदा तीन नवीन ताल सादर करणार असून पोशाखात बदल केला आहे. स्त्रियांसाठी नऊवारी साडी तर मुलांसाठी सदरा अन् मावळे टोपी असा हा पेशवेकालीन पोशाख असणार आहे. ४०हून अधिक महिलावर्ग या पथकात सहभागी असल्याची माहिती पथकाचा प्रमुख आशिष बाबर याने दिली.
वाशीतील शिवस्वराज्य ढोल-ताशा पथकाचे यंदाचे दुसरे वर्ष असून दर रविवारी जवळपास सहा तास सराव करत असल्याची माहिती व्यवस्थापक संतोष राजपुरे यांनी दिली. पथकात जवळपास शंभर सदस्य आहेत.

Web Title: Dhol-Tasha in Maharashtra will move in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.