मुंबईतले धूरके विरतेय; नवी मुंबई मात्र धूरक्यातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 03:15 AM2017-12-12T03:15:17+5:302017-12-12T03:15:30+5:30
मुंबई : शनिवारसह रविवारी मुंबई शहर आणि उपनगरावर पसरलेले धूरके आता काही प्रमाणात कमी होऊ लागले आहे. दोन दिवसांनंतर वातावरणातील धूलिकणांचे प्रमाण कमी झाल्याची नोंद सफरने केली आहे. मात्र नवी मुंबईवरील धूलिकणांचे प्रमाण कायम असून, मुंबईतील बोरीवलीत धूलिकणांचे प्रमाण अधिक नोंदविण्यात आले आहे. दुसरीकडे नवी मुंबई अजूनही धूरक्यातच आहे.
ओखी चक्रीवादळाचा विपरीत परिणाम म्हणून मुंबई शहरासह उपनगरात पावसाच्या सरी कोसळल्या. वातावरण ढगाळ राहिले. किमान तापमानात घट झाली. परिणामी थंडी वाढली. वातावरणात बदल नोंदविण्यात येत असतानाच धूळ आणि धुक्याच्या मिश्रणाने मुंबईवरील वातावरणात निर्माण झालेल्या धूरक्याने मुंबईकरांसमोर अनंत अडचणी निर्माण केल्या. याचा फटका आरोग्यासह रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला बसला. शनिवारसह रविवारी धूरक्याचे प्रमाण अधिक होते. सोमवारी मात्र वातावरणातील धूलिकणांचे प्रमाण कमी झाल्याने धूरक्याची चादर विरली होती. नवी मुंबईत मात्र धूलिकणांचे प्रमाण सर्वाधिक होते.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील तीनएक दिवसांपासून मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात घट नोंदविण्यात येत आहे. सोमवारी कुलाबा आणि सांताक्रुझ वेधशाळेत कमाल तापमान अनुक्रमे २८.२, २८.७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. किमान तापमान २१ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. विशेषत: सकाळसह सायंकाळच्या वातावरणात गारवा वाढत असल्याने पडलेल्या थंडीने मुंबईकरांना दिलासा दिला आहे.
धूरक्यामुळे सहा मेल-एक्स्प्रेस रद्द
धुरक्यामुळे मध्य रेल्वेने ६ मेल-एक्स्प्रेस रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंगळवार ते गुरुवारपर्यंत धावणारी२२१०२ मनमाड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राज्यराणी एक्स्प्रेस आणि २२१०१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मनमाड राज्य राणी एक्स्प्रेस रद्द करण्यात येईल.
तर लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १३ डिसेंबरला सुटणारी ११०८५ एलटीटी-मडगाव एसी डबल डेकर एक्स्प्रेस, १४ डिसेंबरला सुटणारी ११०८६ मडगाव-एलटीटी डबल डेकर एक्स्प्रेस रद्द केली आहे. १२ डिसेंबर ते १४ डिसेंबर दरम्यान ट्रेन क्रमांक ५१३१७-५१३१८ अनुक्रमे कर्जत-पुणे, पुणे-कर्जतही रद्द केली आहे.