Join us

धुळे-नागपूर महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 4:07 AM

एनएच-६वर वर्षांत ५५० ठार; मुंबई-आग्रा हायवे दुसऱ्यास्थानीजमीर काझीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्रात राष्ट्रीय व राज्य ...

एनएच-६वर वर्षांत ५५० ठार; मुंबई-आग्रा हायवे दुसऱ्यास्थानी

जमीर काझी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्रात राष्ट्रीय व राज्य महामार्गाचे जाळे वाढत असताना याठिकाणी अपघाताचे प्रमाण लक्षणीय वाढत आहे. गेल्या वर्षात राष्ट्रीय महामार्गावर तब्बल ६,५०१ दुर्घटना घडल्या आहेत. त्यामध्ये ३,५२८ प्रवासी जागीच ठार झाले. राज्यात सर्वाधिक ९८० अपघात एनएच-६ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुळे-नागपूर महामार्गावर झाले आहेत. जणू मृत्यूचा सापळा बनलेल्या या रस्त्यावर तब्बल ५५० जणांचा जागीच जीव गेला आहे.

अपघातांमध्ये एनएच-३ (मुंबई-आग्रा) महामार्ग दुसऱ्या क्रमांकावर आहे. याठिकाणी गेल्या वर्षात ७८४ अपघात झाले असून, त्यामध्ये ४७४ नागरिक ठार झाले आहेत.

महाराष्ट्रातून सीमा भागातील राज्यांना जोडले जाणारे एकूण २४ राष्ट्रीय हायवे आहेत. त्याशिवाय मुंबई-पुणे या दोन प्रमुख महानगरांना जोडणारा ‘एक्स्प्रेस-वे’ हा एक प्रमुख वर्दळीचा रस्ता आहे. या २५ महामार्गावर १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या एका वर्षात लहान-मोठे एकूण ६,५०१ अपघात झाले आहेत. त्यामध्ये ३,५२८ प्रवासी जागीच ठार झाले. त्यात ३६१ बालिका, तरुणी व महिलांचा समावेश आहे. धुळे-नागपूर या एनएच-६ महामार्गावर सर्वाधिक ९८० अपघात झाले. त्यामध्ये ५५० ठार झाले, तर त्यात ६५ महिलांचा समावेश होता. मुंबई-आग्रा या महामार्गावर ७८४ अपघात झाले. त्यामध्ये ४५ महिलांसह एकूण ४७४ जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर वर्षभरात एकूण १६० अपघात घडले असून, त्यामध्ये तीन महिलांसह एकूण ६६ जणांना जागीच जीव गमवावा लागला. एनएच-४ या कोल्हापूर-पुणे या मार्गावर तब्बल ६०४ अपघात घडले. त्यामध्ये ३७ महिलांसह एकूण ३५९ जणांचा बळी गेला.

---------------

अपघातग्रस्त टॉपटेन हायवे

महामार्ग अपघात ठार महिला-मुली

एनएच-६ ९८० ५५० ६५

एनएच-३ ७८४ ४७४ ४५

एनएच-४ ६०४ ३५९ ३७

एनएच-९ ४७६ २८६ ३२

एनएच-८ ४०७ २५९ ३२

एनएच-२१ ३९१ २३० १४

एनएच-२२ ३७७ १८५ १०

एनएच-१७ ३६३ १२३ १४

एनएच५० ३१० १६१ १८

एनएच-७ २३३ १२५ ६

(उद्याच्या अंकात - हायवेवर अपघातग्रस्तांसाठी मृत्युंजय दूत)