मुंबई : समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनात झालेल्या भ्रष्टाचाराची पुनरावृत्ती आणखी एका महामार्गाच्या भूसंपादनात झालेली आहे. समृद्धी प्रमाणेच धुळे-सोलापूर या रस्ता चौपदरीकरणाच्या भूसंपादनातही ३ हजार कोटी रुपयांचा घोटाळा करुन अधिकारी व दलालांनी करोडो रुपयांची लूट केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.वडेट्टीवार म्हणाले, भूसंपादन करताना कागदोपत्री जास्त क्षेत्रफळ दाखवून ज्या गोष्टी प्रत्यक्षात अस्तित्वात नव्हत्या अशा विहिरी, घरे, बांधकामे, झाडे, हॉटेल्स दाखवून अधिकारी व दलाल यांनी संगनमत करुन करोडो रुपयांची लूट केलेली आहे. या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करावी म्हणून शासनाला पत्र पाठवून एक महिना झाला तरी अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही असेही ते म्हणाले.धुळे सोलापूर रस्ता चौपदीकरणाच्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेत बीड जिल्ह्यातील हिरापूर ते रांजणी ता. गेवराई दरम्यान पाडळशिंगी गाव व परिसर येथे २०१७ मध्ये सुमारे ७ किमीच्या रस्त्यासाठी भूसंपादन करण्यात आले. पाडळशिंगी, तालुका गेवराई येथील कि.मी. १४०/६०० ते कि.मी. २१९/१०० या रस्त्यासाठी ज्यांची जमीन घेण्यात आली, त्यातील अशोक रावसाहेब गव्हाणे यांच्या नावे प्रत्यक्षात ७/१२ नुसार ०.०१ हेक्टर इतके क्षेत्र आणि १ घर असताना ०.०२ हेक्टर क्षेत्र व १३ घरे असल्याचे दाखवून १०६.८४ लाख रुपये लाटले. गट क्रमांक ४२५ मधील ०.०६ हेक्टर ही शासकीय जमीन संपादित केलेली असतांना त्यापोटी असलेला ४९.२५ लाख रुपयांचा मोबदला मगन नामदेव चव्हाण या खाजगी व्यक्तीच्या नावे अदा करण्यात आला आहे. संदीप बळीराम ननवरे यांच्या जमिनीवर प्रत्यक्षात घर नसतानाही घर दाखवून २७.२९ लाख रुपयांचा मोबदला मंजूर करून घेतला आहे.घरासह गोठे दर्शवून ३८.१९ लाख वाढीव मोबदला मंजूर केला. जिनींग मिलच्या जागेत बोगस बांधकामे दाखवून दाल मिल असल्याचे दर्शवून ७६ लाख रुपयांचा वाढीव मोबदला लाटला, असे ते म्हणाले.
धुळे-सोलापूर चौपदरीकरणात ३ हजार कोटींचा घोटाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 4:12 AM