चित्रकार धुरंधर यांचे योगदान दुर्लक्षितच- सुहास बहुळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 03:23 AM2018-09-09T03:23:06+5:302018-09-09T03:23:11+5:30
प्रसिद्ध चित्रकार एम. व्ही. धुरंधर हे बऱ्याच लोकांना ज्ञात नाहीत. कला जगतात त्यांच्या कामाचे मूल्यमापन झालेले नाही, अशी खंत प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुळकर यांनी शुक्रवारी नॅशनल गॅलरी आॅफ मॉडर्न आर्टमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडली.
मुंबई : प्रसिद्ध चित्रकार एम. व्ही. धुरंधर हे बऱ्याच लोकांना ज्ञात नाहीत. कला जगतात त्यांच्या कामाचे मूल्यमापन झालेले नाही, अशी खंत प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुळकर यांनी शुक्रवारी नॅशनल गॅलरी आॅफ मॉडर्न आर्टमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडली.
एम. व्ही. धुरंधर यांच्या १५०व्या जयंती निमित्ताने, १० सप्टेंबर रोजी ‘एम. व्ही. धुरंधर - द रोमँटिक रिअॅलिस्ट’ हे विशेष प्रदर्शन पार पडणार असून, नॅशनल गॅलरी आॅफ मॉडर्न आर्टमध्ये सायंकाळी ६ वाजता प्रदर्शनासह धुरंधर यांच्या कॉफी टेबल पुस्तकाचा उद्घाटन सोहळाही होणार आहे, असे बहुळकर यांनी सांगितले. भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन, दिल्ली आॅर्ट गॅलरी, स्वराज आर्ट अर्चिव्ह यांच्या सहकार्याने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
संकलन राजन जयकर यांनी केले आहे. प्रदर्शनात धुरंधर यांची स्मृतिचिन्हे आणि पदके ठेवण्यात येणार आहेत. पत्रकार परिषदेला नॅशनल गॅलरी आॅफ मॉडर्न आर्टचे संचालक शिवप्रसाद खेनेद, कॉफीटेबल पुस्तकाचे संपादक रितू वाजपेयी मोहन उपस्थित होते.
प्रसिद्ध चित्रकार एम. व्ही. धुरंधर यांच्या चित्रावर आधारित कॉफीटेबल पुस्तक चित्रकार सुहास बहुळकर यांनी तयार केले आहे.
याबाबत बहुळकर म्हणाले की, १९व्या शतकातील प्रसिद्ध चित्रकार राजा रवि वर्मा यांच्यानंतर दुसरे लोकप्रिय चित्रकार म्हणून एम. व्ही. धुरंधर यांना ओळखले जाते. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, मानवी सवयी यावर आधारित चित्रे धुरंधर यांनी रेखाटलेली आहेत. दिल्ली आर्ट गॅलरी, नॅशनल गॅलरी आॅफ मॉडर्न आर्ट आणि डाल्विस आर्ट इन्स्टिट्यूट यांच्या प्रयत्नांनी धुरंधर यांच्या कामाची माहिती मिळाली. ३ ते ४ महिन्यांत रात्रंदिवस मेहनत करून धुरंधर यांची चित्रे संग्रहित करून प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे बहुळकर यांनी सांगितले.
>दुर्मीळ चित्रांचा खजिना
धुरंधर यांनी काढलेले पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, कोल्हापूरच्या अंबाबाईचे चित्र, द्रौपदी वस्त्रहरणाचे रेखाटन, विष्णूने मोहिनीचे रूप घेतलेले चित्र, लग्नसोहळ्यातील चित्रे, मानवाच्या सवयी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित चित्रे, धुरंधर यांच्या पत्नीचा प्लेग होऊन मृत्यू झाल्यानंतर, त्या परिस्थितीचेही चित्रण आपल्या कॅनव्हासवर त्यांनी रेखाटले. हे प्रदर्शन ११ सप्टेंबरपासून ते १३ आॅक्टोबरपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत खुले असेल.