Join us

धुराने कल्याण शहर घुसमटले

By admin | Published: June 01, 2016 2:31 AM

येथील आधारवाडी डम्पिंगला मंगळवारी सायंकाळी ५ च्या सुमारास पुन्हा आग लागली. वाऱ्यामुळे वाढणारी आग आणि त्यातून निर्माण होणारा धूर यामुळे आधारवाडीसह खडकपाडा

कल्याण : येथील आधारवाडी डम्पिंगला मंगळवारी सायंकाळी ५ च्या सुमारास पुन्हा आग लागली. वाऱ्यामुळे वाढणारी आग आणि त्यातून निर्माण होणारा धूर यामुळे आधारवाडीसह खडकपाडा, शिवाजी चौक ते पौर्णिमा चौकीपर्यंत पसरला होता. सुरक्षेच्या कारणास्तव डम्पिंग शेजारील साठेनगर वसाहतीतील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. आग विझवण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या नऊ बंबांसह अन्य ठिकाणच्या बंबांना पाचारण करण्यात आले. दरम्यान, उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नव्हते.पश्चिमेतील आधारवाडी डम्पिंगवर प्रतिदिन ५५० टन कचरा टाकला जातो. या डम्पिंगची क्षमता संपल्यानंतरही तेथे कचरा टाकणे सुरूच आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे एकीकडे ओव्हरफ्लो होत असलेल्या या डम्पिंगच्या दुर्गंधीने परिसरातील रहिवासी हैराण झाले आहेत. त्यातच कचरा पेटण्याचे सत्रही सुरूच आहे. मंगळवारी तेथे पुन्हा आग लागली. गेल्या काही महिन्यातील ही पाचवी ते सहावी घटना आहे. वारा मोठ्या प्रमाणावर वाहत असल्याने आगीचा धूर सभोवतालच्या परिसरात पसरला होता. वारंवार अशा घटना घडत असल्याने तेथील रहिवाशांना श्वास गुदमरणे, खोकला, मळमळणे आदी त्रासाला सामोरे जावे लागले.डम्पिंगला लागलेल्या आगीच्या धुराचे लोट आधारवाडी परिसराबरोबरच वाडेघर, खडकपाडा, लालचौकी, शिवाजी चौक, गौरीपाडा, पौर्णिमा चौकीपर्यंत पसरले होते. आग विझविण्यासाठी केडीएमसीचे नऊ बंब घटनास्थळी दाखल झाले होते. परंतु, आग आटोक्यात न आल्याने भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर येथील अग्निशामन बंबांना पाचारण करण्यात आले. (प्रतिनिधी)ठोस कार्यवाही नाही : उन्हाळ््यात कचऱ्याला आगीच्या घटना वारंवार घडतात. उन्हात कचरा तापतो. त्यात कचऱ्यामुळे निर्माण होणारा मिथेन वायू पेट घेतो. यामुळे आगीच्या घटना घडतात. यावर उपाय म्हणून पाण्याच्या पाइपलाइन डम्पिंगमध्ये टाक ल्या जाणार आहेत. याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे कारण केडीएमसी प्रशासनाकडून दिले जात असत. परंतु, आजवर यासंदर्भात ठोस कार्यवाही झालेली नाही. निविदांना प्रतिसाद नाही : त्यातच घनकचरा व्यवस्थापनप्रकरणी उच्च न्यायालयाने दणका दिल्यानंतर हे डम्पिंग शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली होती. परंतु, यासंदर्भातील निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याने ही कार्यवाही तूर्तास थंडावली आहे. परिणामी परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. त्यामुळे आजुबाजूच्या परिसरातील रहिवाशांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.राष्ट्रीय पर्यावरण संस्थेकडून प्रतिसाद नाहीआगीच्या घटनांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रीय पर्यावरण संस्थेशीही केडीएमसीने पत्रव्यवहार केला होता. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.