Lokmat DIA 2021: बॉडी बिल्डर संग्राम चौगुलेचा लोकमत ‘बेस्ट फिटनेस डिजीटल इन्फ्लूअन्सर’ पुरस्कारानं गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 06:14 PM2021-12-02T18:14:36+5:302021-12-02T18:15:30+5:30
संग्रामचे इन्स्टाग्रामवर जवळपास १.३ मिलियन फोलोअर्स तर यूट्यूबला ४. ६१ लाख फोलोअर्स आहेत.
मुंबई – कधीकाळी इंजिनिअरींग करणारा युवक बॉडी बिल्डिंग क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावतो आणि बॉडी बिल्डर ऑफ डेकेड रेकॉर्ड स्वत:च्या नावावर करतो. या युवकाचं नाव आहे संग्राम चौगुले. ५ वेळा मिस्टर महाराष्ट्र आणि ६ वेळा मिस्टर इंडिया राहिलेल्या संग्रामनं २०१२ आणि २०१४ मध्ये मिस्टर यूनिवर्स हा पुरस्कारही स्वत:च्या नावावर केला आहे. फिटनेस क्षेत्रात आपल्या मेहनतीनं यशाचं शिखर गाठणाऱ्या संग्राम चौगुले यांना लोकमतकडून बेस्ट फिटनेस डिजीटल इन्फ्लूअन्सर या पुरस्कारानं गौरवण्यात आले.
संग्राम चौगुले सोशल मीडियातही प्रचंड सक्रीय आहे. संग्रामचे इन्स्टाग्रामवर जवळपास १.३ मिलियन फोलोअर्स तर यूट्यूबला ४. ६१ लाख फोलोअर्स आहेत. दंडम या सिनेमातून संग्रामनं मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री केली. संग्रामच्या बॉडी बिल्डिंगचे अनेक तरुण चाहते आहेत. २००० मध्ये संग्राम चौगुले यांनी बॉडी बिल्डिंग क्षेत्रात उतरण्याचा मानस केला. तेव्हा प्रत्येक दिवशी संग्राम ३-४ तास वर्कआउट करत होते. पुण्यात झालेल्या खडकी श्री या शरीर सौष्ठव स्पर्धेत संग्रामनं भाग घेतला होता. तेव्हा या स्पर्धेत संग्रामनं बाजी मारली त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.
संघर्षातून गाठलं यशाचं शिखर
कॉलेजमध्ये शिक्षणावेळी संग्रामने पुणे येथील फॅशन डिझाइनर स्नेहलसोबत लग्न केले. लग्नानंतर संग्रामनं घर चालवण्यासाठी एका कंपनीत नोकरी सुरु केली. परंतु त्याठिकाणी मिळणाऱ्या पगारावर कुटुंब चालवणं आणि बॉडी बिल्डिंगची आवड पूर्ण करणं कठीण होत होते. आर्थिक तंगीमुळे संग्रामनं बॉडी बिल्डिंग सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र जेव्हा ही गोष्ट संग्रामच्या मित्रांना समजली तेव्हा त्यांनी संग्रामच्या फिटनेस ट्रेनिंगचा संपूर्ण खर्च उचलला. पण जास्त काळ मित्रांच्या पैशांवर संग्रामला अवलंबून राहावं लागलं नाही. ज्या जीममध्ये संग्राम वर्कआऊट करत होते त्याचठिकाणी ट्रेनर म्हणून त्यांना नोकरी मिळाली त्यामुळे संग्रामची आर्थिक परिस्थिती सुधारली आणि एकाच वेळी कुटुंब आणि फिटनेस यांची सांगड घालणंही सोप्पं गेले.