मधुमेहग्रस्तांनो सावधान...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 04:18 AM2018-04-23T04:18:28+5:302018-04-23T04:18:28+5:30
वाढते तापमान धोकादायक : वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात, तब्येत सांभाळा
मुंबई : मागच्या काही दिवसांत मुंबईसह राज्यभरात तापमानाचा पारा वाढला आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यातील उष्णतेचा अंदाज घेता अशीच परिस्थिती राहिल्यास वृद्ध, लहान मुले यांच्या तब्येतीची योग्य काळजी घ्यावीच लागणार आहे. परंतु, ज्यांना मधुमेहाचा आजार आहे अशा रुग्णांनी या दिवसांत अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
बरेचदा, या दिवसांत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन असतो. अशावेळी प्रत्येकाने काही नियम पाळणे गरजेचे असल्याचे मत मधुमेहतज्ज्ञ डॉ. रोशनी गाडगे यांनी व्यक्त केले. अशा रुग्णांनी या दिवसांत अधिक दक्ष राहणे आवश्यक असून, कुठे बाहेर फिरायला अथवा कामानिमित्त जात असाल तर योग्य ती खबरदारी तसेच गरजेची औषधे सोबत ठेवणे आवश्यक आहे, असेही डॉ. गाडगे म्हणाल्या.
अति उच्च तापमानामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन साखरेचे प्रमाण घटल्याने चक्कर येऊन रुग्ण कुठेही पडू शकतो. तसेच मधुमेह असणाऱ्या रुग्णांना डिहायड्रेशनमुळे थेट किडनीवर परिणाम होण्याची शक्यता असते. क्रिएटीनचे प्रमाण अधिक होऊन किडनी निकामी होण्याची शक्यताही असते. बरेचदा अशा रुग्णांना उष्णतेमुळे अनवाणी चालल्यास अल्सर होण्याची शक्यता असते. मधुमेह असणाºया रुग्णांना पायांना उष्णतेचे फोड किंवा जळजळ होऊन त्या ठिकाणी पुढे जखम होण्याची शक्यता असते. अशा जखमांवर वेळीच उपचार होणे गरजेचे आहे, अन्यथा सेप्टीक होण्याची शक्यता असते, असे मधुमेहतज्ज्ञ डॉ. नियती शहा यांनी सांगितले.
अशी घ्यावी तब्येतीची काळजी
ज्या रुग्णांना टाइप १चा मधुमेह आहे अशा रुग्णांनी बाहेर जाताना सोबत इन्सुलिन पाऊच ठेवणे आवश्यक आहे. या दिवसांत इन्सुलिन ठेवण्यासाठी एका विशिष्ट तापमानाची आवश्यकता असते. अतिउष्णता असल्याने इन्सुलिन साठवून ठेवण्यासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे अन्यथा हे इन्सुलिन खराब होऊ शकते.
बाहेर जाताना सोबत पाण्याची बाटली ठेवणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे मधुमेही रुग्णांनी ग्लुकोमीटर, ग्लुकोस्ट्रीप्स, लिंबू-पाणी, मीठ-पाणी, कोकम सरबत (साखर विरहित) ठेवल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण तपासून वरील पेय घेता येऊ शकतात.