मुंबई : देशाला मधुमेहाची राजधानी म्हणून एकीकडे ओळखले जात आहे. शहरीकरणामुळे मुंबईसारख्या शहरांतदेखील दिवसेंदिवस मधुमेहाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. त्यातच मधुमेही (टाइप २ डायबेटिस) असणाऱ्यांपैकी ७० टक्के जणांना हृदयविकार तर ३० टक्के जणांना मूत्रपिंडाचे आजार जडत असल्याचे डॉक्टरांना आढळून आले आहे. या आजारांवर मात करण्यासाठी जीवनशैलीत बदल करा, असा सल्ला डॉक्टर देत आहेत.मधुमेहावर मात करण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. मधुमेहावर आलेल्या एका नवीन औषधाच्या निमित्ताने झालेल्या संशोधनात हे सत्य उघड झाल्याचे मधुमेह तज्ज्ञ डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले. प्रौढ व्यक्तींना होणारा मधुमेह हा टाइप टू डायबेटिस म्हणून ओळखला जातो. हा मधुमेह जीवनशैलीमुळे होतो. बैठी जीवनशैली, लठ्ठपणा ही त्यामागील प्रमुख कारणे असल्याचे डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले. बैठ्या जीवनशैलीमुळे पोटाचा घेर वाढतो. त्यावर शस्त्रक्रिया करून लठ्ठपणा कमी करण्याचा मार्ग स्वीकारला जातो. बेरीयाट्रिक सर्जरीचे प्रमाण वाढले आहे, पण त्यापेक्षा पोटाचे व्यायाम खासकरून कपालभाती केल्यास पोटावरची चरबी कमी होते. त्यामुळे मधुमेह, रक्तदाब अशा विकारांवर नियंत्रण मिळवता येते, असे अभ्यासांती दिसून आल्याचे डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले. परदेशी लोकांचे आपण अनुकरण पण परदेशी लोक सकाळी खूप धावतात, त्याचे अनुकरण आपण करत नाही याकडे डॉ. जोशी यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)
मधुमेहींना मूत्रपिंडाच्या विकारांचा धोका
By admin | Published: June 24, 2016 3:57 AM