Join us

राज्यात मधुमेह, रक्तदाबाचा आलेख वाढता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 4:34 AM

अहवालातील निष्कर्ष : बदलत्या जीवनशैलीमुळे आजारांचा विळखालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला आहे. ...

अहवालातील निष्कर्ष : बदलत्या जीवनशैलीमुळे आजारांचा विळखा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला आहे. मात्र, या विषाणूच्या संसर्गाचा सर्वाधिक धोका अतिजोखमीचे आजार असलेल्या गटाला असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण अहवालानुसार, राज्यात उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा विळखा वाढत असल्याचे दिसून आले आहे.

बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेही आणि रक्तदाबाचे रुग्ण वाढत आहेत. रक्तातील साखर नियंत्रणासाठी औषधांवर अवलंबून राहणाऱ्या १५ वर्षांहून अधिक वयाच्या महिलांचे प्रमाण १२.४ टक्के आहे. यात शहरी महिला १४.६ टक्के तर ग्रामीण महिला १०.७ टक्के आहेत. अशाच मधुमेहाचा आजार असलेल्या पुरुषांची टक्केवारी १३.६ टक्के आहे. यामध्ये शहरातील १५.३ टक्के, तर ग्रामीण भागातील १२.४ टक्के पुरुषांचा समावेश आहे.

उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी २३ टक्के महिला, तर २४.४ टक्के पुरुष औषधांवर अवलंबून आहेत. यात शहरी महिलांचे प्रमाण २३.८ टक्के आणि पुरुषांचे प्रमाण २५.७ टक्के आहे, तर ग्रामीण भागातील २२.६ टक्के महिला आणि २३.५ टक्के पुरुष या समस्येसाठी औषधांवर अवलंबून आहेत.

* ग्रामीण भागातील ५६ टक्के महिला ॲनिमियाग्रस्त

अहवालातील निष्कर्षांनुसार, ग्रामीण भागातील महिला व पुरुषांमध्ये ॲनिमियाचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. १५ ते ४९ वयोगटांतील महिलांमध्ये ॲनिमिया (रक्तक्षय) असणाऱ्यांचे प्रमाण २०१५-१६ सालच्या अहवालानुसार ४८ टक्के इतके होते, यात २०१९-२० साली वाढ होऊन हे प्रमाण आता ५२ टक्के झाले आहे. शहरी भागातील महिलामंध्ये हे प्रमाण ५२ तर ग्रामीण भागात ५६ टक्के इतके आहे. याचप्रमाणे, शहरी भागांतील पुरुषांमध्ये हे प्रमाण १९ टक्के तर ग्रामीण भागातील पुरुषांमध्ये ३४ टक्के आहे. त्यामुळे कोरोनासह अन्य आजारांवरील उपाययोजनांसाठी ग्रामीण भागात आरोग्यसेवा बळकट होण्याची गरज अधोरेखित होत आहे.