सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्णसंख्येत घट
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाल्याचे दिसून आले. मंगळवारी २८ हजार ४३८ नवीन काेराेना रुग्ण आणि ६७९ मृत्यूंची नोंद झाली. रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाणही सातत्याने वाढताना दिसत आहे. सोमवारी २६,६१६ रुग्णांचे निदान, तर ५१६ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली हाेती.
राज्यात मंगळवारी दिवसभरात ५२ हजार ८९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ४९ लाख २७ हजार ४८० रुग्ण काेराेनामुक्त झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. सध्या ४ लाख १९ हजार ७२७ रुग्ण उपचाराधीन आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.६९ टक्के झाले असून, मृत्यूदर १.५४ टक्के आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५४ लाख ३३ हजार ५०६ झाली असून, मृतांचा आकडा ८३ हजार ७७७ इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी १५ लाख ८८ हजार ७१७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७.२ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३० लाख ९७ हजार १६१ व्यक्ती होम क्वारंटिनमध्ये, तर २५ हजार ४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटिनमध्ये आहेत.
................................