मुंबई : स्तनांच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी रक्तनमुन्याचा वापर करणारे मॅमोअॅलर्ट या आधुनिक तंत्रज्ञानाचे अनावरण, नुकतेच मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस आणि आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या उपस्थितीत पार पडले. या वेळी गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, महिला व बाल कल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर इत्याही मान्यवर उपस्थित होते.रक्ताच्या एका थेंबाद्वारे अवघ्या १५ मिनिटांत स्तन-कर्करोगाचे निदान ही यंत्रणा करते. या यंत्रणेची अचूकता ९५ टक्क्यांपर्यंत असल्याने, चुकीचा दर शून्यावर जातो. या वेळी अमृता फडणवीस म्हणाल्या की, ‘स्तन कर्करोगाच्या चळवळीचा एक भाग होत असल्याचा आनंद आहे. या आधी महिलांना स्तनांच्या कर्करोगाच्या तपासणी करण्यासाठी शरीर उघडे करावे लागत होते. त्यामुळे अनेक स्त्रिया या चाचण्या करण्यास धजावत नसत. मॅमोअॅलर्ट पद्धतीमुळे स्त्रियांना मुक्तपणे चाचण्या करता येतील.’देशात दीड लाख स्त्रियांना स्तनांच्या कर्करोगाचे निदान होत असून, सुमारे ७० हजार स्त्रियांना या रोगामुळे प्राणाला मुकावे लागते, अशी माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिली. सावंत म्हणाले की, ‘देशात दर सात मिनिटाला एक स्त्री स्तनाच्या कर्करोगाला बळी पडते. या तंत्रज्ञानामुळे अनेक सर्वसामान्य स्त्रियांचे जीव वाचवणे शक्य होणार असून, हेच सरकारचे ध्येय आहे.’ (प्रतिनिधी)
रक्ताच्या थेंबातून स्तन-कर्करोगाचे निदान
By admin | Published: March 23, 2017 1:57 AM