पोलिसांच्या अद्ययावत यंत्रणेला ‘डायल १००’ची जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 06:48 AM2018-06-28T06:48:18+5:302018-06-28T06:48:25+5:30
शहरातील सीसीटीव्हींचे जाळे आणि मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात अद्ययावत यंत्रणा वापरून केलेल्या बदलात ‘डायल १००’ हा अद्ययावत उपक्रम मोलाची भर घालणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुंबई : शहरातील सीसीटीव्हींचे जाळे आणि मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात अद्ययावत यंत्रणा वापरून केलेल्या बदलात ‘डायल १००’ हा अद्ययावत उपक्रम मोलाची भर घालणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुंबई पोलिसांच्या ‘डायल १००’ या उपक्रमाचे बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
मुंबई पोलिसांच्या ‘डायल १००’, एमपीआयएस, एबीएमआयएस, संवाद अॅप याच्यासह पोलीस दीदी, मुंबई पोलीस फाउंडेशन, मुख्यालयात उभारण्यात येत असलेले संग्रहालय अशा विविध उपक्रमांचा लोकार्पण सोहळा मुंबई पोलिसांच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आला होता. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देशातील अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली यंत्रणा मुंबई पोलिसांकडे आहे. त्यात अशा उपक्रमामुळे मुंबई पोलिसांच्या नावलौकिकात भर पडत आहे. पोलीस दल हे शिस्तीचे आहेच, तरीसुद्धा नागरिकांसाठी पोलीस हे संवेदनशील असलेच पाहिजे, असे सूचनावजा मतही त्यांनी या वेळी बोलताना व्यक्त केले.
शहरात ५ हजारांहून अधिक सीसीटीव्हींचे जाळे बसविले आहे. मुंबई पोलीस दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षात अद्ययावत यंत्रणेच्या जोडीला ‘डायल १००’ ची जोड दिल्यामुळे कामकाजाला गती येईल. या यंत्रणेतून नागरिकांपर्यंत तत्काळ पोहोचण्यास मदत होईल. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर असलेली वायरलेस सीस्टिम, एपीआयएस, एबीएमआयएस यामुळे गुन्ह्यांची उकल करत, गुन्हेगारांना शिक्षेपर्यंत पोहोचविण्यात पोलिसांना मदत होत आहे. त्यामुळे शहरातील गुन्ह्यांची संख्याही घटल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
‘डायल १००’मुळे मुंबईकरांना अवघ्या काही मिनिटांत मदत मिळेल. तत्काळ पोहोचण्यास मदत
दाखल गुन्हे, गुन्हेगारांची माहिती यासाठी एबीएमआयस प्रणाली कार्यान्वित आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत गुन्हे, गुन्हेगारांच्या माहितीचा डाटा पोलिसांकडे गोळा झाला आहे. पोलीस दीदी, मुंबई पोलीस फाउंडेशन असे काही चांगले उपक्रम राबवित आहोत. ‘डायल १००’ व अन्य प्रणालीद्वारे नागरिकांपर्यंत तत्काळ पोहोचण्यास मदत होईल असे, पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर म्हणाले.
या वेळी पशू व दूध संवर्धनमंत्री महादेव जानकर, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, आमदार राज पुरोहित, गृहराज्यमंत्री (शहरे) रणजीत पाटील, आमदार अमिन पटेल, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, गृहसचिव सुनील पोरवाल, पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर, पोलीस अधिकारी, अंमलदार उपस्थित होते.
अत्याधुनिक यंत्रणेने सज्ज
दूरध्वनी करणाऱ्यांचा पत्ता शोधण्यासाठी पेट्रोलिंग वाहनांमध्ये मोबाइल डाटा टर्मिनल
जीपीएसयुक्त वाहनशोध यंत्रणा
आपत्ती व्यवस्थापनासाठी सीसीटीव्ही यंत्रणेने युक्त
घटनास्थळाचा पत्ता शोधणारे आॅटोमेटिक कॉलर लोकेशन आयडेंटिफिकेशन
१ लाख दूरध्वनी हाताळण्याची क्षमता
कमीतकमी वेळेत तातडीची मदत
मोबाइल सर्व्हेलन्स व्हॅन
मुंबई पोलिसात सध्या ५ आधुनिक तंत्रज्ञानयुक्त मोबाइल सर्व्हेलन्स व्हॅन उपलब्ध
पाचही वाहनांमध्ये कमांड कंट्रोल सेंटरची क्षमता
सीसीटीव्हीद्वारे मुख्य केंद्रीय नियंत्रण कक्षाला थेट प्रक्षेपण पाठविण्याची सोय
तत्पर सेवा व प्रतिसादासाठी मोबाइल व्हॅनचा उपयोग