लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य सरकार ‘डायल ११२’ लवकरच संपूर्ण राज्यात कार्यान्वित करणार असून, त्यामुळे लोकांना आपत्कालीन व संकटाच्या वेळी तत्काळ पोलीस आणि इतर मदत मिळणे अधिक सोपे होणार आहे. अशी माहिती गृह आणि माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा प्रकल्प राबवला जात असून, त्याद्वारे शहरी भागात १० मिनिटांत तर ग्रामीण भागात १५ मिनिटांमध्ये पोलिसांचे पोहोचणे शक्य होणार आहे. त्याबाबतच्या आढावा बैठकीनंतर ते म्हणाले, या प्रकल्पाच्या माध्यमातून पोलीस आणि इतर आपत्कालीन सरकारी व्यवस्थांशी या क्रमांकावरून संपर्क साधता येतो. ‘बिग डेटा ॲनालिटिक्स’ तंत्रज्ञ वापरून राज्यातील ४५ आयुक्तालये आणि जिल्हा घटक कार्यालयांचे पोलीस नियंत्रण कक्ष अद्ययावत केले गेले आहेत. या योजनेखाली तब्बल १५०२ चारचाकी आणि २२६९ दुचाकी पोलीस वाहनांना ‘मोबाइल डेटा टर्मिनल’ आणि ‘जीपीएस’ यंत्रणा बसविली जात आहे. त्यातील ८४९ चारचाकी आणि १३७२ दुचाकींना ही यंत्रणा बसविली असून, त्यांची तांत्रिक चाचणीसुद्धा पूर्ण झाली आहे. या तंत्रज्ञानामुळे ही वाहने २४ तास आणि सातही दिवस लोकांच्या सेवेत उपलब्ध राहणार आहेत.
त्याशिवाय १५ हजार पोलिसांना या तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रशिक्षण देत आहोत. ‘डायल ११२’मध्ये उच्च तंत्रज्ञान वापरले गेले असून, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना पोलीस आणि इतर आपत्कालीन यंत्रणांबरोबर मोबाइल ॲप्लिकेशन, एसएमएस सेवा, ई-मेल आणि चॅटच्या माध्यमातून संपर्क साधणे शक्य होईल.
या प्रकल्पाची आढावा बैठक गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे - पाटील, गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.