लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हल्ली राजकारणात संवाद हरवत चालला आहे. कोणीही उठतो आणि कोथळा काढण्याची भाषा करतो. संवादाची परिभाषा बदलत चालली आहे. त्यात बदल घडविण्यासाठी मृणाल गोरे यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाच्या कार्याचा आदर्श समाजापुढे मांडला पाहिजे, असे मत खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.
गोरेगावमधील केशव गोरे स्मारक ट्रस्टमध्ये ‘मृणालताई गोरे दालना’चे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी मृणालताईंच्या आठवणींना उजाळा दिला. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव आदी यावेळी उपस्थित होते. पवार म्हणाले, मंत्री म्हणून मला अनेकदा मृणालताईंच्या आंदोलनाचा सामना करावा लागला. सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांनी ऐरणीवर आणले. महागाईविरोधात आंदोलन करत त्यांनी सरकारला घेरले होते. त्यावेळी मी गृह राज्यमंत्री होतो. यातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी भाऊसाहेब वर्तक यांच्याकडचे अन्न व नागरी पुरवठा खाते माझ्याकडे दिले. भुकेचा प्रश्न महत्त्वाचाच होता. अनेकदा त्याकडे दुर्लक्ष झाले होते. मृणालताई, अहिल्याताई यांनी उपस्थित केलेले मुद्दे खरे होते. आम्ही त्यांच्याशी संवाद साधला. संवादातून ही कोंडी फुटत गेली. आता मात्र राजकारणात परिस्थिती वेगळी आहे. मृणालताईंसारख्या लढाऊ व्यक्तिमत्त्वांचा महाराष्ट्राच्या राजकारणात ठळक ठसा आहे. त्यांचे कार्य केवळ सामान्य नागरिक नव्हे, तर राजकारण्यांसाठी दिशादर्शक आहे, असेही पवार म्हणाले.
या कार्यक्रमाला आमदार कपिल पाटील, सुनील प्रभू, विद्या चव्हाण, सुभाष वारे, ललिता भावे, नितीन वैद्य, सतीश वाघ, भारत करमरकर, नंदू धनेश्वर तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
......
...अन् शिवसेनाप्रमुखांनी दिला होता आदेश
मृणालताई आदर्श राजकारणी होत्या. महाराष्ट्रभर फिरून माहिती घेत विधानसभेत त्या सरकारला धारेवर धरायच्या. काम कसे करावे हे त्यांच्याकडून शिका, असे आदेश आम्हाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिले होते. मृणालताईंच्या नावाने उड्डाणपूल असावा यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला असे सांगत सुभाष देसाई म्हणाले की, राज्यात मृणालताईंच्या नावाने एक आदर्श केंद्र उभे करण्याचा संकल्प आपण करुया.
......
निर्मळ आणि कणखर नेतृत्व!
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी अध्यक्षीय भाषण करताना मृणालताईंच्या कामाचा पट लोकांसामोर मांडला. वैद्यकीय शिक्षण सोडून समाजकारणात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. लोकांच्या प्रश्नांवर त्यांची जी तळमळ होती त्यात आईची ममता होती. अतिशय निर्मळ आणि कणखर नेतृत्व त्यांनी केले. प्रतिकूल परिस्थितीत त्या सत्तेविरुद्ध झुंजत राहिल्या. त्यांच्या कार्यातून ही वृत्ती समाजामध्ये पसरत राहील. मृणाल गोरे दालन नवी प्रेरणा समाजामध्ये निर्माण करेल असा विश्वास आहे, असेही ते म्हणाले.