हिरे व्यापारी हत्याप्रकरणात आणखी तिघांना बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 05:52 AM2018-12-12T05:52:03+5:302018-12-12T05:52:24+5:30
अटक आरोपींमध्ये दोन महिला; दिनेश पवार, प्रणीत भोईरची रवानगी पोलीस कोठडीत
मुंबई : घाटकोपरमधील हिरे व्यापारी राजेश्वर उदानी (५७) यांच्या हत्येप्रकरणी मंगळवारी दोन महिलांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणात अटकेत असलेले निलंबित पोलीस दिनेश पवारसह प्रणित भोईर यांना १५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.
पनवेलचा महेश प्रभाकर भोईर (३१), बारबाला निखत ऊर्फ झारा मोहम्मद खान (२०) हिच्यासह सायीस्ता सरवर खान ऊर्फ डॉली (४१) यांना मंगळवारी अटक करण्यात आली. झारा ही डॉलीच्या मामाची मुलगी आहे. डॉलीच्या सांगण्यावरुन झारा ही सचिनच्या संपर्कात आल्याची माहिती समोर आली आहे. उदानी यांच्या अपहरणाआधी मुख्य आरोपी सचिन पवार याने विक्रोळीच्या टागोरनगर येथे आरोपींची भेट घेतली होती. तेथून तो राजकीय पक्षाच्या बैठकीला निघून गेला.
अपहरणासाठी वापरलेल्या कारमध्ये झारा आणि प्रणीत भोईर होता. पुढे घणसोली परिसरात दिनेश हा महेश आणि अन्य साथीदारांसह कारमध्ये चढले. त्यांनी उदानी यांची हत्या केल्याचे समोर येत आहे. या प्रकरणातील दिनेश आणि प्रणितला कोठडीसाठी मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी दिनेशने पोलिसांनी मारहाण केल्याचे नाटक केले. मात्र त्यात काहीही तथ्य नसल्याने दोघांनाही १५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या कपड्यांचाही शोध घेणे बाकी असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
यावेळी आरोपींचे वकील समाधान सुलाणी यांनी पोलिसांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचे सांगितले. प्रणीतकडे रिक्षाचा परवाना आहे. त्याच्याकडे चारचाकी वाहनाचा परवाना नाही. त्यामुळे तो कार चालवत होता, हे आरोप चुकीचे आहेत. शिवाय घटनेच्या दिवशी तो घरातच असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे.
जबरदस्तीचा प्रयत्न
दिनेशविरुद्ध पंतनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. हत्येच्या काही दिवसांनंतर तो वसई-विरार येथील तरुणीच्या घरी आला. तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने प्रतिकार केल्यानंतर स्थानिकांनी धाव घेतली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी दिनेशला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध पंतनगर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांबाबत समजताच, त्याला पंतनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिल्याची माहिती समोर आली.