हिरा व्यापा-याला फसवून कोटींचे हिरे लंपास, वांद्रे येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 03:17 AM2017-10-14T03:17:16+5:302017-10-14T03:17:44+5:30
हि-याच्या व्यापा-याला फसवून कोटींचे हिरे लंपास करण्याचा प्रकार वांद्रे येथे शुक्रवारी घडला. या प्रकरणी बीकेसी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे.
मुंबई: हि-याच्या व्यापा-याला फसवून कोटींचे हिरे लंपास करण्याचा प्रकार वांद्रे येथे शुक्रवारी घडला. या प्रकरणी बीकेसी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे.
रिकीन शाह (३२) असे या प्रकरणातील तक्रारदाराचे नाव आहे. वाळकेश्वरला त्याचे मुख्य कार्यालय आहे. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून हिरे विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार, शाह त्याला भेटले. तेव्हा त्याने काही हिरे पसंत केले. याची आॅर्डर आणतो. मात्र, त्यासाठी काही हिरे मला सॅम्पल म्हणून द्या, असे त्याने शाह यांना सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत, शाह यांनी त्या इसमाला १ कोटी ३६ लाख ७८ हजार रुपये किमतीचे हिरे, एक पावती बनवून दिली. मात्र, त्यानंतर तो इसम परतलाच नाही.
शाह यांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोदेखील होऊ शकला नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे शाह यांच्या लक्षात आले. एका ६५ वर्षांच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती बीकेसी पोलिसांनी दिली.