दोन वर्षांत 1 लाख 42 हजार बालकांना अतिसार; जगभरात दरवर्षी 15 लाख मुलांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 04:18 AM2020-02-03T04:18:00+5:302020-02-03T06:25:31+5:30
गेल्या दोन वर्षांत राज्यात शून्य ते पाच वयोगटांतील १ लाख ४२ हजार नवजात बालकांना अतिसाराची लागण झाली होती
- स्नेहा मोरे
मुंबई : देशात पाच वर्षांपर्यंतच्या बालकांच्या मृत्यूचे अतिसार हे प्रमुख कारण असून १० टक्के बालके अतिसारामुळे दगावतात आणि त्याचे प्रमाण उन्हाळ्यामध्ये व पावसाळ्यामध्ये जास्त असते. गेल्या दोन वर्षांत राज्यात शून्य ते पाच वयोगटांतील १ लाख ४२ हजार नवजात बालकांना अतिसाराची लागण झाली होती; मात्र त्यातील केवळ ४२ हजार ९४५ रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर अतिसाराच्या प्रतिबंधासाठी शासनाने कठोर उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होत आहे.
जगभरात दरवर्षी पाच वर्षांखालील १५ लाख बालकांचा मृत्यू अतिसाराने होतो. देशात अतिसारामुळे दरवर्षी २ लाख बालमृत्यू होतात. अतिसार हा विषाणू, जिवाणू किंवा परजीवींमुळे होऊ शकतो. अर्भक मृत्यू व बाल मृत्यू दर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. अतिसारामुळे होणारे मृत्यू हे टाळता येण्यासारखे असून क्षारसंजीवनी (ओआरएस) व झिंकच्या वापरामुळे हे सहज शक्य होते.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, मुंबईत दोन वर्षांत ३० हजार ५० बालकांना अतिसार झाला आहे. त्यातील अवघ्या ३ हजार ३३९ बालकांना रुग्णालयात उपचार देण्यात आले. मुंबईतील रुग्णांमध्ये स्थलांतरित रुग्णांचाही समावेश आहे. तर मुंबईखालोखाल पुण्यात २३ हजार ३४० बालकांना अतिसार झाल्याचे निदान झाले आहे, त्यापैकी ३ हजार ८७१ रुग्णांवर रुग्णालयांत उपचार केले आहेत.
नेहमीच्या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात पातळ शौचास होणे म्हणजे अतिसार होय.
अशुद्ध पाणी, अस्वच्छ हात, अस्वच्छ अन्नाचे सेवन इत्यादी कारणांमुळे अतिसार होतो. यात शरीरातील पाणी व क्षारांचे प्रमाण कमी होऊन शुष्कता येते. अशा प्रकारच्या शुष्कतेवर वेळीच उपचार केले नाहीत तर त्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे ही शुष्कता ओआरएससारख्या साध्या उपचाराने कमी करता येते व अतिसाराने होणारे मृत्यू टाळता येतात. अशी माहिती ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. शैलेंद्र शहा यांनी दिली.
प्रतिबंधासाठी हे महत्त्वाचे
वैयक्तिक तसेच परिसर स्वच्छता राखावी. बाळाला भरविण्यापूर्वी तसेच शौचाहून आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत. स्वच्छ व निर्जंतूक केलेले पाणी पिण्यासाठी वापरावे. पिण्याचे पाणी उंचावर व झाकून ठेवावे, पाणी घेण्यासाठी ओघराळ्याचा वापर करावा. ताजे व स्वच्छतापूर्वक बनविलेले अन्न खावे/ बाळास भरवावे
धोक्याची लक्षणे
कुपोषण, तीन महिन्यांपेक्षा लहान बाळ, १० टक्के किंवा त्यापेक्षा वजनात घट, नुकतेच गोवर किंवा इतर संक्रमित रोगाची लागण झालेले बाळ, पोट फुगणे, संडासमध्ये रक्त पडणे, आठ तास किंवा यापेक्षा जास्त वेळ लघवी न होणे, बेशुद्ध होणे व झटके येणे.
धोक्याच्या पातळीत बाळ मलूल-निस्तेज होते, अन्न-पाण्यास नकार देते. कधीकधी बाळ बेशुद्ध होते. यावर उपाय म्हणून जलसंजीवनी, उत्तम पोषक आहार, झिंक देण्यात यावे.