Join us  

‘डिब्बे की आवाज कितनी है, ‘लाइन को लंबी पारी चाहीये’, सट्टा बाजाराची 'कोड लँग्वेज'

By मनीषा म्हात्रे | Published: April 03, 2023 8:37 AM

मुंबईत कोट्यवधींची उलाढाल, सट्टेबाजीकडे लहान मुलांचा कल, दिवसाला ६०० कोटींचे टार्गेट

मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ‘सेशन एका पैशाचे आहे’ , ‘डिब्बे की आवाज कितनी है’ , ‘लाइन को लंबी पारी चाहीये’, ‘मैने चवन्नी खा ली’ या हिंदी कोड डायलॉगसोबतच, ’तुझ्याजवळ किती लाइन आहेत’, ‘आज कोण फेव्हरेट आहे’ अशी मराठी विविध वाक्ये सध्या सट्टेबाजीच्या ट्रेंडमध्ये आहेत. ही वाक्ये आपल्याला असंबद्ध वाटत असली, तरी सट्टा बाजारात ती कोड लँग्वेज आहेत. या वाक्यांतून कोट्यवधींचे व्यवहार सुरू आहेत. चिंतेची बाब म्हणजे, ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली हा सट्टेबाजीचा गोरखधंदा सुरू असून, याकडे तरुणाईसोबतच लहान मुलांचा कल वाढत आहे.

आयपीएलचा नवीन सिझन सुरू झाल्याने, आता फक्त क्रिकेट पाहण्याऐवजी अमुक खेळाडू खेळायला हवा, मी जिंकलो, तर एवढे पैसे मिळतील, या कारणांमुळे या खेळाडूला टीममध्ये घेतले, अशा चर्चा घराघरांत, नाक्यावर प्रत्यक्षात तर फोनवर आणि सोशल मीडिया ग्रुपवर रंगू लागल्या आहेत आणि क्रिकेटप्रेमींचे हेच वेड हेरून विविध वेबसाइटच्या माध्यमातून सट्टेबाजीचा धंदा सुरू आहे. त्यात गेमच्या आडूनही सट्टाबाजार जोर धरत आहे. त्यामुळे पूर्वी फोन कॉल्सपुरता मर्यादित असलेल्या सट्टाच्या ऑनलाइन बाजारावर लक्ष ठेवण्याचे पोलिस यंत्रणांसमोर आव्हान आहे.

सट्टाबाजारात क्षणाक्षणाला चित्र बदलते, भाव बदलतात. सट्टा खेळणाऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यांना या खेळांची विचित्र आणि वैशिष्ट्यपूर्ण भाषा शिकवून सट्टा खेळण्यासाठी तयार केले जात असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

सट्ट्यांचे प्रशिक्षण अन् बरंच काही...

- इंटरनेटवर अनेक वेबसाइट्सही आहेत, ज्यावरून कुठलेही शारीरिक श्रम न घेता ऑनलाइन सट्टा खेळतात. - काही साइट्सवर तर बेटिंग कसे खेळावे, नुकसान न होता पैसे कसे जिंकावे, याचे प्रशिक्षणही दिले जाते.

अशीही फसवणूक...

सट्टेबाजीची वाढती क्रेझ लक्षात घेता, सायबर भामटेही सक्रिय झाले आहेत. त्यांनी अशाच विविध गेम्स ॲपमध्ये खेळाडूवर पैसे लावून जिंकून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक सुरू केली आहे. मुंबईत आयपीएल सुरू झाल्यानंतर, दोन फसवणुकीचा घटना समोर आल्या.

६० बुकी अन् १८ ॲप

- गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दादरच्या हॉटेलमध्ये इंग्लंड आणि पाकिस्तान टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यादरम्यान छापा टाकून एका आंतरराज्यीय ऑनलाइन सट्टेबाजी रॅकेटचा पर्दाफाश केला होता.- यात पाच सट्टेबाजांना अटक केली होती. १८ ऑनलाइन ॲप्सचा तपशील हाती लागला. - बुकी अँथनी डायस, इम्रान खान, धर्मेश शिवदासानी, धर्मेश व्होरा, गौरव शिवदासानी यांच्या चौकशीतून ६० बुकींचे नेटवर्कही समोर आले.

गुन्हे शाखेचा वॉच

सट्टेबाजी करणाऱ्यावर गुन्हे शाखेकडून वेळोवेळी कारवाई केली जाते. यामध्ये ऑनलाइन सट्टेबाजीवर गुन्हे शाखेचे विशेष लक्ष आहे. त्यानुसार, कारवाई करण्यात येईल. तरुणांनीही कुठल्याही आमिषाला बळी पडू नये. -डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा.

टॅग्स :क्रिकेट सट्टेबाजीलहान मुलंआयपीएल २०२३