मुंबई: प्रभादेवी परिसरात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केली नसल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. बंदूक ही सदा सरवणकर यांचीच आहे, पण गोळी झाडणारा व्यक्ती दुसराच असल्याचं पोलिसांच्या अहवालात सांगण्यात आलं आहे.
पोलिसांच्या सदर अहवालावर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी निशाणा साधला आहे. तीन महिन्यांआधी वेगळा अहवाल आणि आता वेगळ अहवाल पोलिसांनी सादर केला आहे. यामध्ये आर्श्चय वाटण्याचं काहीच कारण नाही. कारण यापूर्वी ज्यांच्यावर ईडी, सीबीआयची चौकशी झाली, ते लोक भाजपात गेल्यानंतर त्यांना क्लिनचीट देण्यात आली. त्यामुळे सदा सरवणकर देखील भाजपाच्या सरकारचे भाग आहेत, त्यामुळे त्यांनाही क्लिनचीट देण्यात आली, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे.
भास्कर जाधव पुढे म्हणाले की, वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना क्लिनचीट मिळाली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना देखील क्लिनचीट मिळाली. त्यामुळे ज्यांना ज्यांना कोणत्याही प्रकरणातून आणि कोणत्याही चौकशीतून सूटका करुन घ्यायची असेल, त्यांनी भाजपामध्ये जावं किंवा भाजपाला समर्थन द्यावं, विषय संपला, असा निशाणाही भास्कर जाधव यांनी भाजपावर साधला. अभिनेत्री उर्फी जावेदचं काय झालं?, ती भाजपामध्ये गेली की काय?, आता तिच्या कपड्यांबद्दल कोणीच काही बोलत नाहीय, असंही भास्कर जाधव यांनी यावेळी सांगितले.
काय आहे प्रकरण?
गणेश विसर्जनासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शिवसेना आणि शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये राडा झाला होता. यावेळी दादर पोलीस ठाण्याबाहेर गोळीबार झाला होता. हा गोळीबार शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांनी केल्याचा आरोप झाला होता. शिंदे गटात असलेले माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि वरळीतील शिवसेनेच्या माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्यात वाद झाले होते. दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर शनिवारी शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती.