आदित्यने 'साहेब' म्हणायला सांगितलं होतं का?; जायचं तर सरळ जा, 'मातोश्री'वर चिखलफेक नको; किशोरीताईंचे खडे बोल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 04:48 PM2022-07-19T16:48:11+5:302022-07-19T16:49:36+5:30
शिवसेनेच्या आमदारांना संपवून १०० आमदार राष्ट्रवादीचे निवडून आणण्याचे उद्देश ठेऊन अजित पवारांनी प्रयत्न केले
मुंबई - किती लोकांची तुम्ही हकालपट्टी करणार आहात? इतरांची हकालपट्टी करण्यापेक्षा तुमच्या आजूबाजूला शिवसैनिक आहेत की पवारांची माणसं ते पाहा. आमदारांना शिवीगाळ, आक्रमक भाषा वापरली गेली. राष्ट्रवादी सोडावी इतकीच मागणी आमदारांची होती, बंडखोर आमदारांची येण्याची तयारी होती पण उद्धव ठाकरेंनी ऐकलं नाही अशी खंत शिवसेनेतून हकालपट्टी केलेले नेते रामदास कदम यांनी व्यक्त केली. रामदास कदम आज माध्यमांसमोर बोलताना ढसाढसा रडल्याचं दिसून आलं. त्यानंतर, आता शिवसेनेकडून रामदास कदम यांच्यावर पलटवार करण्यात आला आहे.
शिवसेनेच्या आमदारांना संपवून १०० आमदार राष्ट्रवादीचे निवडून आणण्याचे उद्देश ठेऊन अजित पवारांनी प्रयत्न केले. ५१ आमदारांनी हे पाऊल उचललं नसतं तर पुढील निवडणुकीत शिवसेनेचे १० आमदारही निवडून आले नसते. महाराष्ट्राचा खजिना अजित पवारांनी राष्ट्रवादीसाठी लुटला. प्रशासकीय अनुभव नसल्याने उद्धव ठाकरेंना फसवलं. पक्ष फुटतोय तरी तुम्हाला शरद पवार का हवेत? हा हट्ट कुणाचा आहे? तुमच्या बाजूला पक्षद्रोही आहेत ते ओळखा. बेईमानी आमच्या रक्तात नाही. आम्हाला शिवसेना वाचवायची आहे असा घणाघात रामदास कदम यांनी केला. तसेच, आदित्य ठाकरेंना साहेब म्हणावं लागतंय, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली होती. आता, कदम यांच्या या आरोपानंतर शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
काल तुम्ही म्हणालात मरेपर्यंत शिवसेनेत राहणार, मुलं कुठं जायची ती जाऊदे पण मी शिवसेनेत राहणार, असं नका करू कोणाचं आदर्श घ्यायचा. समस्त शिवसैनिकांना प्रचंड राग आणि द्वेष येत आहे. जायचं असेल तर सरळ जा परंतु मातोश्रीवर, उद्धवजी आणि आदित्यजींवर चिखलफेक करू नका, अशा शब्दात किशोरी पेडणेकर यांनी रामदास कदमांना उत्तर दिलं आहे पेडणेकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून कदम यांच्यावर निशाणा साधला.
आदित्य ठाकरेंबाबत काय म्हणाले होते कदम
मला आदित्य साहेब म्हणावं लागतं. माझं वय ७० आहे. कारण ते ठाकरे आहेत. मातोश्रीतले आहेत. आदित्य ठाकरेंनी संयम पाळायला हवा होता. जे जे आमदार गेले त्यांनी पक्षासाठी योगदान दिले आहेत. उद्धव ठाकरेंनी दिले नाही माणूस कर्तृत्वाने मोठा होता. पक्षासोबत माणसांचेही योगदान आहे. मंत्री बनवला म्हणजे भीक दिली असं नाही हे उद्धव ठाकरेंनी समजू नये असंही रामदास कदम म्हणाले.
आदित्य, दीड वर्षे माझ्या कॅबिनमध्ये येऊन बसत
दीड वर्ष आदित्य ठाकरे मी पर्यावरण मंत्री असताना माझ्या कॅबिनमध्ये येऊन बसायचे. मला म्हणायचे भाई या अधिकाऱ्यांना बोलावा, सचिवांना बोलवा, बैठक लावा. बाहेरच्या माणसांना बसवून मंत्रालयात अधिकृत बैठका घेत येत नाही. तरीही मी उद्धव ठाकरेंचे चिरंजीव म्हणून बैठका लावल्या. प्लास्टिक बंदी मी केली आणि श्रेय आदित्यला मिळाले. काका काका म्हणणारे माझेच खाते घेऊन बसणार आहेत हे मला माहित नव्हतं. इतके राजकारण आम्ही घरात कुटुंबात केले नाही असा घणाघात रामदास कदमांनी आदित्य ठाकरेंना लगावला.