जयपूर : सोशल मीडियावर नागरिकांसह पोलिसांनीही वावरायला सुरूवात केली आहे. मुंबई पोलिस ट्विटरवर कमालीचे कार्यरत असताना आता अन्य राज्यांचे पोलिस खातीही ट्विटरवर आली आहेत. काही वेळा या खात्यांवर मजा-मस्करीचे समाजोपयोगी संदेश पोस्ट केले जातात. असेच एक राजस्थान पोलिसांचे ट्विट चर्चेत आले आहे.
राजस्थानच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठ्या प्रमाणावर गांजाची पोती पकडली आहेत. मात्र, याचा मालक कोण हे अद्याप त्यांना शोधता आलेले नाही. यामुळे पोलिसांनी हे फोटो ट्विटर हँडलवर पोस्ट करताना थोडी मस्करी केली आहे. पोलिसांनी त्यांच्या ट्विटमध्ये ''कोणाचा गांजा हरवला आहे का?'' असा प्रश्न विचारला आहे. तसेच याचबरोबर त्या व्यक्तीला मोफत राहण्याची आणि जेवनाची व्यवस्था करण्याचे आश्वासनही दिले आहे.
जर कोणाचा गांजा हरवला असेल आणि त्याला तो परत हवा असेल तर त्या व्यक्तीने आपल्याशी संपर्क साधावा. अन्यथा गांजा कायमचा गमवून बसाल. आम्ही आमच्या खर्चाने मोफत राहण्याची आणि जेवनाची सोय करणार आहोत, यामुळे घाई करावी, असे ट्विट राजस्थान पोलिसांनी केले आहे.