Join us

Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 7:02 PM

Baba Siddique Latest News: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली. सिद्दिकींना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती, असेही म्हटले गेले. याबद्दल आता पोलिसांनी उत्तर दिले आहे. 

Baba Siddique : तीन आरोपींनी अंदाधूंद गोळीबार करत बाबा सिद्दिकींची हत्या केली. या हत्या प्रकरणाने मुंबई आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर एक मुद्दा चर्चेत आला, तो म्हणजे त्यांना वाय दर्जाची सुरक्षा असल्याचा. १५ दिवसांपूर्वी बाबा सिद्दिकींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांची सुरक्षा वाढवली होती. पण, त्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती का? याबद्दल पोलिसांनी माहिती दिली आहे. 

मुंबईपोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाच्या तपासाबद्दल माहिती दिली. यावेळी पोलिसांना बाबा सिद्दिकी यांना असलेल्या सुरक्षेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. 

बाबा सिद्दिकींना वाय दर्जाची सुरक्षा होती का? 

बाबा सिद्दिकी यांना वाय दर्जाची सुरक्षा होती का? या प्रश्नाला उत्तर देताना पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना कोणत्याही दर्जाची सुरक्षा नव्हती. त्यांच्या सुरक्षेसाठी तीन पोलीस नियुक्त करण्यात आले होते.

पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून दोन पिस्तुल आणि स्प्रे जप्त करण्यात आले आहेत. 

आरोपी आधी बाबा सिद्दिकी यांच्यावर मिरची स्प्रे मारणार होते. त्यानंतर दुसरा आरोपी गोळीबार करणार होता. पण, हे सगळं होण्याआधीच तिसरा आरोपी शिव कुमार गौतम यांने गोळ्या झाडल्या. आरोपींनी गोळ्या झाडल्या त्यावेळी तीन कॉन्स्टेबल तिथे होते, पण अचानक गोळीबार केल्याने पोलिसांना काही करता आले नाही, अशी माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिली. 

बाबा सिद्दिकी प्रकरणात चार आरोपी

पोलिसांच्या तपासात आणखी माहिती समोर आली असून, बाबा सिद्दिकींच्या हत्या प्रकरणात चार आरोपी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी गुरमैल सिंह आणि धर्मराज कश्यप या दोघांना अटक केली आहे. शिव कुमार गौतम हा फरार आहे. यात आणखी एक आरोपी असून, त्याचे नाव पोलिसांनी कोर्टात सांगितले आहे. मोहम्मद जिशान अख्तर असे या आरोपीचे नाव आहे.

टॅग्स :बाबा सिद्दिकीमुंबईगुन्हेगारीपोलिस