Join us

मोठ्या मास्तरांनी गुजरातीचे धडे पण गिरवायला लावले का?; आदित्य ठाकरेंवर विरोधकांचा निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 2:42 PM

वरळीत आदित्य ठाकरेंचे मोठे मोठे होर्डिंग्स लावण्यात आले. यात विशेष म्हणजे गुजराती, तेलगू भाषेत लावलेल्या या होर्डिंग्समुळे आदित्य ठाकरे आणि शिवसेनेवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली.

मुंबई - विधानसभा निवडणुकीमुळे राज्यात वातावरण गरम होऊ लागलं आहे. शिवसेना-भाजपा मित्रपक्ष युतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे या निवडणुकीत ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. शिवसेना पक्षप्रमुख यांचे चिरंजीव आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे वरळीतून विधानसभा निवडणूक लढविणार आहेत. जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंनी राज्यभर शिवसेनेच्या प्रचाराचा झंझावात सुरु केला. आदित्य संवादच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकून समस्या सोडविण्याचे प्रयत्न केले. वरळीतून आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यानंतर संपूर्ण वरळीत आदित्य ठाकरेंचे मोठे मोठे होर्डिंग्स लावण्यात आले. यात विशेष म्हणजे गुजराती, तेलगू भाषेत लावलेल्या या होर्डिंग्समुळे आदित्य ठाकरे आणि शिवसेनेवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली. सोशल मीडियातही अनेकांनी आदित्य ठाकरेंच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. 

यात विरोधी पक्षांनीही आदित्य ठाकरेंना टीकेचं लक्ष्य केलं आहे. सत्तेसाठी कायपण असं म्हणणाऱ्या शिवसेनेवर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तोंडसुख घेतलं आहे. 'कसं काय वरळी'चं रुपांतर 'केम छो वरळी'मध्ये झालंय? युतीत राहून मोठ्या मास्तरांनी गुजरातीचे धडे पण गिरवायला लावले का? कुठे गेला मराठी माणसांचा न्याय हक्क? कुठे गेला मराठी बाणा आणि कणा? अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षाची स्थापना केली. मराठी लोकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आक्रमकरित्या शिवसेनेने लढा दिला. मात्र कालांतराने शिवसेनेने मराठीचा मुद्दा बाजूला सारुन हिंदुत्वाकडे वळू लागली. त्यामुळे मराठीसोबत इतर भाषिकांची मते मिळविण्यासाठी शिवसेनेने उत्तर भारतीय सेनेचीही स्थापना केली होती. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने वरळीत गुजराती कार्ड खेळलं असल्याने त्याचा कितपत फायदा शिवसेनेला यंदाच्या निवडणुकीत होईल हे आगामी काळात कळेल. मात्र पदापर्णातच मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन आदित्य ठाकरेंना टीकेचं लक्ष्य व्हावं लागलं आहे. यावर शिवसेनेकडून येणाऱ्या काळात काय उत्तर दिलं जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.  

टॅग्स :आदित्य ठाकरेशिवसेनाभाजपाअमित शहा