Join us

'निवडणुकापुरती भाजपाला छत्रपती हवे होते का?'; शिवसेनेचा सवाल, स्पष्टीकरण देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 2:57 PM

भाजपाच्या या टीकेनंतर आता शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे.

मुंबई- संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्याने शिवसेनेने सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यावर संभाजीराजे समर्थकांनी आमच्यासोबत दगाफटका झाल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत हेच याला कारणीभूत असल्याचे सांगत मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी संताप व्यक्त केला. 

शिवसेनेने संभाजीराजेंना वगळून सहाव्या जागेसाठी उमेदवार दिल्याने भाजपाकडून टीका करण्यात येत आहे. संभाजीराजे हे छत्रपतींचे वारसदार आहेत. त्यांना एखाद्या शिवसैनिकाप्रमाणे वेळ देऊन शिवबंधन बांधण्यासाठी मातोश्रीवर बोलावणे म्हणजे खुद्द छत्रपतींचा अपमान आहे, असं भाजपाचे नेते प्रवीण दरेकर म्हणाले होते.

भाजपाच्या या टीकेनंतर आता शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे. छत्रपती संभाजीराजे भाजपावर ऐवढे नाराज का आहेत? भाजपातून बाहेर जाण्याचा निर्णय त्यांनी का घेतला? भाजपा त्यांना थांबवून दुसरी जागा का देत नाही? फक्त निवडणुकींपुरता भाजपाला छत्रपती हवे होते का? याचे स्पष्टीकरण भाजपाला द्यावेच लागणार, असं दीपाली सय्यद म्हणाल्या.

दरम्यान, संभाजीराजेंना शिवसेनेची ४२ मते देण्यासाठी तयार होतो. ही जागा शिवसेनेची आहे, तुम्ही शिवसेनेचे उमेदवार व्हा ही आमची अट नव्हती तर भूमिका होती. छत्रपती किंवा राजघराण्याला राजकीय पक्षाचे वावडे नसावे. मोठ्या महाराजांनी शिवसेनेत, काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मालोजीराजे, स्वत: संभाजीराजे राष्ट्रवादी, भाजपा आदी पक्षांकडून निवडणुका लढले आहेत. आमदार खासदार राहिले आहेत. यामुळे त्यांच्या समर्थकांचे दावे खोटे आहेत, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले. 

मी कोणत्याच पक्षाच्या बंधनात अडकणार नाही- संभाजीराजे

मी कोणत्याच पक्षाच्या बंधनात अडकणार नाही. महाविकास आघाडीसह अन्य कोणत्या पक्षांनी माझी उमेदवारी पुरस्कृत केल्यास त्याला माझी काही हरकत नाही. परंतू तशा कोणत्याही घडामोडी अजून तरी दिसत नाहीत. जे पक्ष उमेदवारीस पाठिंबा देतील, त्या पक्षांना सहयोग असू शकेल. सहयोग म्हणजे सहकार्य. सहयोगी सदस्यत्व नव्हे. त्यांनी पाठिंबा दिला आहे, म्हटल्यावर सभागृहात त्या पक्षांच्या धोरणांना पाठिंबा, मतदान त्या पक्षाच्या बाजूने या गोष्टी मला मान्य असतील. परंतू थेट कोणत्याही पक्षाची उमेदवारी स्विकारणार नाही.

टॅग्स :संभाजी राजे छत्रपतीदीपाली सय्यदशिवसेनाभाजपा