विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे खरेच कमी झाले का?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 06:00 AM2018-12-13T06:00:39+5:302018-12-13T06:01:00+5:30
सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल; परीक्षा कालावधीत केली पाहणी
- सीमा महांगडे
मुंबई : चिमुकल्यांच्या खांद्यावरचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने आदेश काढले. सोबतच केंद्र सरकारने राज्यातील ५० शाळांतील विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याचे सर्वेक्षण करण्याबाबतच्या सूचना संचालनालयाला दिल्या होत्या. या पाहणीत मुंबईतीलही दोन मनपा शाळांचा अहवाल सादर करण्यात आला. पाहणीत विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे मानकाप्रमाणे असल्याचे आढळून आले. मात्र, परीक्षा कालावधीत ही पाहणी केल्यामुळेच ओझे कमी असल्याचे सांगत, सामाजिक कार्यकर्त्यांनी या पाहणी अहवालावर आक्षेप घेतला आहे.
केंद्र सरकारने सर्वेक्षण करण्यासाठी गुगल फॉर्मच्या तीन लिंक दिल्या होत्या. यामध्ये मुख्याध्यापक, पालक, तसेच विद्यार्थ्यांना विचारायची प्रश्नावली अशा तीन लिंक आहेत. शाळेच्या मुख्याध्यापकाचे मत, प्रत्येक शाळेतील पाच पालक आणि पाच विद्यार्थ्यांचे मत, यामध्ये जाणून घेण्यात आले आहे. मुंबईतील ग्लोब मिल पॅसेज मराठी शाळा आणि छबिलदास लल्लूभाई प्राथमिक शाळा या शाळांची पलिका अधिकाऱ्यांनी भेट घेऊन दप्तराच्या ओझ्याची पाहणी केली. यामध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरांच्या ओझ्याची पाहणी करताना, साहित्यासह आणि साहित्याशिवाय दोन्ही प्रकारे वजन केले. यात रिकामे दप्तर, वह्यांचे वजन, कंपास, शालेय डायरी, पाण्याची बाटली, जेवणाचा डबा यांचेही वजन केले. शेवटी एकूण वजन करून अहवाल सादर केल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. नियमांप्रमाणे शाळा सुरू झाल्यावर पहिल्या ३ महिन्यांत पाहणी न करता, ती परीक्षा कालावधीत केल्याने आकडेवारीत फरक झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी केला आहे.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार दप्तराचे ओझे
पहिली आणि दुसरी - १.५ किलोपेक्षा कमी
तिसरी ते पाचवी - ३ किलोपेक्षा कमी
सहावी आणि सातवी - ४ किलोपेक्षा कमी
आठवी आणि नववी - ४.५ किलोपेक्षा कमी
दहावी - ५ किलोपेक्षा कमी
मुंबईतल्या २ शाळांमधील दप्तराच्या ओझ्याची माहिती
विद्यार्थ्यांच्या या दप्तरातील
५ वस्तूंचे वजन (सरासरी)
पाठयपुस्तके आणि वह्या - १ किलो
रिकामे दप्तर - ६० ते ७० ग्रॅम
कंपास वजन - ८० ग्रॅम
पाण्याच्या बाटलीचे वजन - २५० ग्रॅम
जेवणाच्या डब्याचे वजन - ५० ग्रॅम
एकूण वजन - १ ते १.५ किलो