Join us

यंदा मुलांना जंतनाशक गोळ्या मिळाल्या का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 4:10 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुले व पौगंडावस्थेतील मुला-मुलींसाठी जंताच्या आजाराचा सामना करण्यासाठी २०१५ सालापासून राष्ट्रीय जंतनाशक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुले व पौगंडावस्थेतील मुला-मुलींसाठी जंताच्या आजाराचा सामना करण्यासाठी २०१५ सालापासून राष्ट्रीय जंतनाशक दिन हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार मातीतून प्रसार होणाऱ्या कृमींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक सहा महिन्याला ही माेहीम राबविली जाते. मात्र यंदा कोरोनामुळे शाळा, अंगणवाड्या बंद असल्याने मुलांना या गोळ्या मिळाल्या की नाही, यावर प्रश्न उपस्थित होत आहे.

मुलामुलींमधील जंताचे आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी ही जंतनाशक गोळ्यांचे वाटप मोहीम हाती घेण्यात आली आहे. राज्यातील शासकीय, शासकीय अनुदानित, महानगरपालिका व खासगी अनुदानीत शाळा, आश्रमशाळांमधून ही मोहीम राबविण्यात येते. त्याचप्रमाणे ग्रामीण व शहरी भागातील अंगणवाडी, मिनी अंगणवाडी केंद्रामध्ये ही मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेमध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग, शिक्षण विभाग व आदिवासी कल्याण विभाग यांचा सहभाग असून पालिकेच्या , जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत या गोळ्यांचे वाटप करण्यात येते.

ज्या मुलांना कृमिदोष मोठ्या प्रमाणावर आहे, अशांना जंतांच्या औषधामुळे मळमळणे, डोकेदुखी अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. मात्र ती सुरक्षित असतात. दरम्यान, मुंबईतील मुलांना जंतनाशक गोळ्या मिळाल्या का ? त्यासाठी काय नियोजन करण्यात आले ? याची उत्तरे अनुत्तरित आहेत. दरम्यान, यासाठी पालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

बालकाची बौद्धिक व शारीरिक वाढ खुंटते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार भारतामध्ये १ ते १४ वयोगटातील जवळपास ६८ टक्के मुले आहेत. त्यातील २८ टक्के मुलांना वैयक्तिक व परिसर स्वच्छतेअभावी आतड्यांमध्ये वाढणाऱ्या परजीवी जंतापासून (कृमी) धोका आहे. या जंत किंवा कृमीदोषांचा संसर्ग मुलांना दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे सहजतेने होतो. बालकांमध्ये होणारा दीर्घकालीन कृमीदोष हा व्यापक आहे, हा मुलांना आरोग्याच्यादृष्टीने अशक्त करणारा असतो. कृमीदोषामुळे रक्तक्षय आणि कुपोषण तर वाढतेच परंतु त्यामुळे बालकाची बौद्धिक व शारीरिक वाढही खुंटते. जंतामुळे मुलांमध्ये कुपोषण आणि रक्तक्षयाचे आजार बळावत आहेत. आजारामुळे मुले शिक्षणापासून वंचित होऊ लागली होती.